नीरज चोप्राने रचला इतिहास:डायमंड लीग जिंकणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

झुरीच:-नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुन्हा एकदा त्याने भारतीयांची मान गर्वाने उंच केली आहे. नीरजने डायमंड लीगचा अंतिम सामना जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावलं. ज्यूरिखमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रो केला आणि पदकावर आपलं नाव कोरलं. 24 वर्षीय नीरज हा डायमंड लीग फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला. अंतिम फेरीत भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता याकुब वाडलेज आणि जर्मनीच्या ज्युलियन वेबरचा पराभव केला.

हरियाणातील पानिपतजवळील खंडारा गावातील नीरज रहिवासी आहे. त्याने 27 ऑगस्ट रोजी डायमंड लीगमधील लुसाने लीगमध्ये देखील पदक पटकवलं होतं. त्यानंतर डायमंड लीगकडे सर्वांच्या नजरा होत्या. याआधी तो 2017 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीपर्यंत खेळला होता. मात्र त्याला यश मिळालं नव्हतं.

ज्युरिखमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिला थ्रोला फाऊल मिळाला. दुखापतीने त्रस्त असलेल्या नीरजने हिंमत सोडली नाही. त्याने दुसरा प्रयत्न केला. दुसरा प्रयत्न यशस्वी ठरला आणि त्याने विरोधी खेळाडूंना धूळ चारली. तिसरा प्रयत्न आणखी चांगला झाला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. जी 88.44 मीटर नोंदवण्यात आली.

Image

नीरज चोप्राने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले त्यानंतर त्याची जगभरात चर्चा झाली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो अभिनव वृंदा नंतर दुसरा भारतीय ठरला. याशिवाय अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा पहिला खेळाडू आहे. या वर्षी नीरजने तीन मोठे विक्रम केले. 24 जुलै रोजी यूजीन, यूएसएमध्ये झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याने रौप्य पदक मिळवलं. यादरम्यान नीरजला दुखापत झाली आणि त्यामुळे २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नाही.