राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

मुंबई,२० डिसेंबर/प्रतिनिधी:-  महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे श्री.सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना श्री. सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत श्री.सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. श्री.सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये श्री.सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दीड कोटी रुपयांची रोकड जप्त
आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरी पुणे पोलिसांनी दुसरा छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

टीईटी परीक्षेत ८०० विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यासाठी तुकाराम सुपे व शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांना ४ कोटी २० लाख रुपये मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातील १ कोटी ७० लाख रुपये सुपे यांना मिळाले होते. सुपे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी ८८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड, पाच ग्रॅमचे सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने, साडेपाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीची कागदपत्रे त्यांच्याकडं आढळली होती. मात्र, पोलिसांनी झडत घेण्याच्या आधीच सुपे यांची पत्नी आणि मेहुण्याने काही रक्कम दुसरीकडे ठेवली होती. पोलिसांनी दुसऱ्यांदा छापा टाकून घेतलेल्या झडतीत १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

या समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे; शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे; शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे; संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

उपरोक्त समिती सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल १५ दिवसांत शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर करेल. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.