दसरा मेळाव्याच्या खडाजंगीत शरद पवारांची एन्ट्री!

मुंबई ,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- दसऱ्याच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा, हा शिवसेनेचा अविभाज्य घटक आहे. मात्र यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून सध्या प्रचंड खडाजंगी सुरु आहे. अनेक नेत्यांनी याबाबत आपली मते मांडली. मात्र या वादात आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एन्ट्री घेतल्याचे दिसत आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे.’, असे विधान करत त्यांनी आपली भूमिका मांडली.
 
पवार म्हणाले की, “मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते केवळ एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरून सामोपचाराने वाद सोडवणे शक्य होईल.” दसरा मेळावा कोणाचा होणार हा वाद सुरु असतानाच पवारांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे ते स्वतः आता ठाकरेंना दसरा मेळावा घेण्याची संघी मिळावी, यासाठी मैदानात उतरले आहेत का? अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.

“आधी एकाचा कार्यक्रम मग दुसऱ्याचा…”, अजितदादांचं भन्नाट उत्तर!
“शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मैदानात सभा व्हायच्या. त्याच मैदानातून त्यांनी ‘उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात पुढची शिवसेना चालेल’ हेही सांगितलं होतं. मात्र ज्यांच्या हातात पॉवर असते, ते त्याप्रमाणे गोष्टी करतात. यातून पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. शेवटी जनता कोणाच्या पाठीशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यावरच लक्षात येईल.”, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे म्हणणे आहे.