वैजापूर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस ; झाडे उन्मळून पडली, वीज पुरवठा खंडित

वैजापूर,३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- सलग तिसऱ्या दिवशी शहर व परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे जवळपास दीड तास झोडपून काढले. बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली. या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडून तारा तुटल्याने काही काळ शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता .

रस्त्यावर झाडे पडल्याने वैजापूर शिर्डी, वैजापूर म्हस्की, वैजापूर पुरणगाव या रस्त्यावर वाहतुक बंद होऊन अडथळा निर्माण झाला.वैजापूर ग्रामीण 2 मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकं आडवी पडली तर पुरणगांव रस्त्यावरील पाटाजवळ झाड उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला. महालगांव परिसरात ही दीड ते दोन तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.