राज ठाकरेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही – शरद पवार

भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल

मुंबई ,१३ एप्रिल /प्रतिनिधी :-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांच्या ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिवाजी महाराजांचे नाव कधीच घेत नाही, असा आरोप केला होता. त्यानंतर आज शरद पवार यांनी राज यांच्या आरोपांना उत्तर देत राज ठाकरे यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो असा आरोप केला जातो. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध तेव्हाही होता आणि आताही असल्याचे पवार म्हणाले. जेम्स लेनचे लिखाण गलिच्छ होते. त्याला ज्यांनी माहिती पुरवली ती योग्य नव्हती, असे देखील पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, शिवरायांना घडवण्यात राजमाता जिजाऊंचे योगदान असून, शिवरायांचे नाव घेत नाही हा आरोप खोटा असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शाहु, फुले, आंबेडकर यांचा उल्लेख ही शिवरायांच्या विचारांची मांडणी असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमाचीदेखील आठवण करून देत राज यांच्या कालच्या भाषणात सामान्यांचा एकही प्रश्न नसल्याची टीकादेखील पवार यांनी राज ठाकरेंवर केली असून, त्यांच्या भाषणात मूळ मुद्द्यांना बगल देण्यात आल्याचे ते म्हणाले.

महागाईबाबत राज ठाकरे गप्प का? असा सवाल देखील यावेळी शरद पवार यांनी केला आहे. तसेच प्रबोधनकार ठाकरे याचे लिखाण वाचण्याचादेखील सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राष्ट्रवादी पक्ष जातीय राजकारण करत असल्याच्या राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व विविध जातीच्या नेत्यांच्या हातात आहे. त्यामुळे जातीचे राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. भाषणात त्यांनी सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान पदासाठी आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता. आजही आम्ही एकत्र आहोत, असे ते म्हणाले. पवार म्हणाले की, राज्यात वीजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. मुंबईतील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरेच्या या वक्तव्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल.

महागाई, विकास इ. प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी देशात धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांप्रदायिक विचाराला प्रोत्साहन देण्याचे चित्र सध्या दिसत आहे. लोकांनी याला बळी पडू नये, असेही शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम प्रबोधनकारांनी केले

आज खा. शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केलेल्या वक्तव्यावर टीका केली.

पवार म्हणाले की, “मी धर्माचे प्रदर्शन करत नाही. मी आजवर १२ ते १४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा. पण त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही. दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत. प्रबोधनकारांचे लिखाण जर तुम्ही वाचले तर यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. प्रबोधनकारांनी देव-धर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रचंड टीका-टिप्पणी केली. धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम त्यांनी केले. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही लोक वाचतो. पण सगळेच वाचतात असे नाही. बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत, असे दिसते. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही.”