श्री.साईबाबा संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना कायम करा -विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी उठविला आवाज

औरंगाबाद,२७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- श्री.साईबाबा संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना श्री. साईबाबा संस्थानच्या अस्थापनेवर कायम करुन त्यांना पुर्वलक्षी प्रभावाने वेतनातील फरक देण्यात यावा यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्द्याद्वारे आवाज उठवला. यावेळी आ.प्रशांत बंब यांनी निवृत्त कंत्राटी कामगारांची व्यथा दर्शविणारा फोटो विधानभवनात दाखवुन अध्यक्ष व  संपूर्ण  सभागृहाचे लक्ष वेधले.

साईबाबा संस्थानच्या 598 कामगारांना स्थायी नेमणूक देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर  पाठपुरावा करु

यामध्ये बोलतना आ.प्रशांत बंब म्हणाले की, श्री साईबाबा शिडी संस्थानमध्ये सन २००० ते २००४ मध्ये एकाचवेळी लागलेल्या एकूण १६८७ कंत्राटी कामगारांपैकी ५९८ कामगारांना १०५२ कामगारांप्रमाणे निकष लावून सेवेत कायम करून २०१० पासूनचा वेतन फरक पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ अदा करण्यात ​ यावा.

श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांचे आस्थापनेवर सन २००० ते २००४ या कालावधीत कंत्राटी पद्धतीने १६८७ कामगार कार्यरत असणे, द.म. सुखथनकर समितीने १९९४ ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी अधिनियम २००४ या कालावधीतील १६८७ कामगारांना कायम स्वरुपी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिलेली असणे, त्याप्रमाणे सन २००९ च्या आकृतीबंधामध्ये सदर पदांचा समावेश केलेला असणे, श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी १६८७ कंत्राटी कामगारांपैकी फक्त १०५२ कामगारांना कायम स्वरुपी स्थायी कर्मचारी म्हणून संस्थानच्या सेवेत सामावून घेतलेले असणे, उर्वरित ५९८ कंत्राटी कामगारांची संस्थानच्या सेवेत सामावून घेण्याची सातत्याने असलेली मागणी दीर्घकाळ मान्य न झाल्याने त्यापैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असतानाही त्यांना मंजुर आकृतीबंधानुसार न्याय मिळून सेवेत कायम न केल्याने तीव्र नाराजीसह अनेकांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी टी-शर्ट वर मजकूर लिहून निषेध व्यक्त केलेला असणे, एकाचवेळी लागलेल्या १०५२ व ५९८ कामगारांच्या कामाचे स्वरुप तुलनात्मकदृष्ट्या एकसमान असणे, तथापि एकसारखे काम असतानाही ५९८ कामगारांच्या वेतनामध्ये कमालीची तफावत असणे, समान काम समान वेतन या तत्वाचा विचार करता या ५९८ कंत्राटी कामगारांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असणे, या कामगारांची मागणी लक्षात घेता त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचेसोबतच लागलेल्या परंतु सन २०१० मध्ये स्थायी करण्यात आलेल्या १०५२ कामगारांप्रमाणे वेतन व अन्य समान निकष लावून समान वेतनावर सन २०१० पासुनच कायमस्वरुपी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती देणे, या ५९८ कामगारांना २०१० पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा फरक मिळणे, जेणेकरून एकाचवेळी लागलेल्या १०५२ व ५९८ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमधील भेदभाव झाल्याची व अन्याय झाल्याची भावना दूर होईल अशा या अतिशय महत्वाच्या विषयावर मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे असे आ.प्रशांत बंब म्हणाले.

आ.प्रशांत बंब व डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते.