वैजापूर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी 68 कोटींचा निधी मंजूर – आ.रमेश पाटील बोरणारे

वैजापूर, २२ ऑगस्ट / प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर विधानसभा  मतदार क्षेत्रातील ग्रामीण रस्ते दुरुस्ती आणि पूल बांधणीसाठी ६८ कोटीचा निधी मंजूर केल्यामुळे येत्या काही महिन्यात  ग्रामीण भागातील वेगवेगळे दळणवळणाचे जवळपास 50 किलोमीटर रस्त्यांची स्थितीत कमालीची सुधारणा होणार असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येईल असा विश्वास आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनी व्यक्त केला.

राज्यातील अभूतपूर्व सत्तांतरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रीपदाची प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा  मतदार संघातील अनेक वर्षापासून प्रलंबित पडलेले ग्रामीण रस्ते दुरुस्ती, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना, औद्योगिक वसाहत, शनिदेवगाव येथे गोदावरी नदीत उच्च पातळी बंधारा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना कार्यान्वित करण्याच्या अटीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत गेलेले वैजापूर मतदार संघाचे आ.रमेश बोरनारे यांनी विकास प्रश्नांना चालना देण्याची भुमिका घेतल्याचे स्पष्ट केले. एका खाजगी उद्योजकांने सहाशे कोटीची आर्थिक गुंतवणूक करुन या भागात खाजगी तत्वावर साखर कारखाना कार्यान्वित करण्याचा पायाभरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरकण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी येत्या वर्षभरात साखर कारखान्याचा पर्याय निर्माण होणार असल्याचे समाधान बोलताना व्यक्त केले.

भौगोलिकदृष्ट्या ग्रामीण भागाचा अधिक समावेश असलेल्या या मतदार संघातील संपर्क रस्त्याची स्थिती अशी दयनीय झालेली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून पावसाळी अधिवेशन सत्रात पुरवणी मागणी मान्य दिली.जवळपास 68 कोटीचा निधी मंजूर  केला आहे.

वैजापूर तालुक्यातील बिलोणी खंडाळा राज्यमार्ग क्रमांक 412 या अकरा कि.मी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी नऊ कोटी, तिडी ते काटेपिंपळगाव या नऊ कि.मी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी साडे आठ कोटी, मनुर ते भोकरगाव, वैजापूर ते खंबाळा या रस्त्यांसाठी प्रत्येकी सात कोटी, चेंडुफळ ते नेवरगाव या तीन कि.मी रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी , परसोडा ते करंजगाव व पालखेड ते काटेपिंपळगाव या रस्त्यांसाठी साडे चार कोटी, राज्यमार्ग 39 तांदुळवाडी (ता.गंगापूर) या गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी दोन कोटी दहा लाख रुपये, गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथे शिवना नदीवर पुल बांधण्यासाठी सुमारे अकरा कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यमार्ग 216 काटेपिंपळगाव ते शंकरपूर (ता. गंगापूर) येथे शिवना नदीवर पुल बांधण्यात येणार असुन या कामासाठी राज्य सरकारने सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या उपलब्ध निधीमुळे वैजापूर- गंगापूर मतदार संघातील प्रलंबित विकास कामांना वेग येणार आहे.