विनायक साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात सहकारमंत्री अतुल सावे यांना निवेदन

वैजापूर,२२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र तथा राज्याचे माजी सहकारमंत्री कै. विनायकराव पाटील यांच्या कल्पनेतून साकार झालेला व गेल्या 21 वर्षांपासून बंद असलेला विनायक सहकारी साखर कारखाना सुरू करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

तालुक्यात गेल्या काही वर्षात सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे ऊस लागवड ही मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र, तालुक्यातील हक्काचा विनायक साखर कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेजारच्या नगर व नाशिक जिल्हयातील साखर कारखान्याकडून अडवणूक केली जात आहे. तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा, बोर दहेगांव मध्यम प्रकल्प, नारंगी मध्यम प्रकल्प, मन्याड साठवण तलाव व इतर प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्र वाढले असून 50 हजार एकरांपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आली आहे. ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे  बंद असलेला तालुक्यातील विनायक साखर कारखाना सुरू करण्याची गरज आहे. परंतु पुढाऱ्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे हा कारखाना अद्यापही सुरू झालेला नाही. 57 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी राज्य सहकारी बँकेने जप्त केलेला हा कारखाना जयहिंद शुगर लि. या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिला आहे. मात्र या कंपनीने कारखाना सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही हालचाल सुरू केलेली नाही.विनायक सुरू झाल्यास तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हा कारखाना त्वरीत सुरू करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर कारखान्याचे माजी संचालक तथा शेतकरी चंद्रकांत कटारे, शिवक्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील बोडखे, सोमनाथ मगर, अरुण मलिक यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.