वैजापूर बाजार समिती निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ ; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

सर्वच राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा ; उमेदवारांची चाचपणी सुरू 

जफर ए.खान 

वैजापूर ,२७ मार्च  :- कोरोना व इतर कारणामुळे लांबणीवर पडलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. राजकीय पक्षांच्या बैठकांना तालुक्यात वेग आला असून प्रत्येकाकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. असे असले तरी आघाडी करण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असून आघाडी करण्यासंदर्भात बोलणी सुरू आहे तसेच उमेदवारांची चाचपणी ही करण्यात येत आहे. तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. 

बाजार समितीची निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत घेतला असल्याची चर्चा असली तरी भाजपच्या एका गटाचा त्यास विरोध आहे. तर दुसरीकडे शिवसेना उध्दव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून भाजपमधील नाराज असलेला गट त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान आजपासून बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या 18 जागा असून त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघ 11जागा (मतदार संख्या-1470), ग्रामपंचायत मतदारसंघ 04 जागा (मतदारसंख्या -1135), व्यापारी मतदारसंघ 02 जागा (मतदारसंख्या – 162) व हमाल मापाडी मतदारसंघ 01 जागा (मतदारसंख्या 320) अशा 18 जागांसाठी ही निवडणूक होणार असून एकूण मतदार संख्या 3087 आहे.