आम्ही ५० थरांची हंडी फोडली : मुख्यमंत्री

ठाणे : आम्ही दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली. बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही ही हंडी फोडली. यामध्ये आम्ही पन्नास थर लावले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील राजकीय भुकंपाच्या आठवणी जाग्या केल्या.

राज्यात आज दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या दहीहंडी उत्सवाला येताना मला विशेष आनंद होतो की दिघे साहेबांचं स्वप्न होतं की एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आता ते प्रत्यक्षात आले आहे. काय त्या माणसाची दूरदृष्टी असेल, काय त्यांचे विचार असतील. मला आनंद होतोय की या दहीहंडी उत्सवाला मला उपस्थित राहता आले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारमधून सर्वांना न्याय देण्याचे काम करणार आहे. त्यामुळे सर्वांना सांगू इच्छितो की जल्लोषात आणि काळजी घेऊन उत्सव साजरे करा. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे संशय आला, किंवा लक्षणे वाटली तर आपली तपासणी करुन घ्या. कोविड, स्वाईन फ्लू आणि डेंग्यू याचा देखील फैलाव होतोय त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. मर्यादा वैगेरे बस झाले दोन अडीच वर्षे आपण हे पाळले. त्यामुळे आपण गणेशोत्सावातील नियम-अटी शिथील केल्या, सर्व परवानग्यांचे पैसे माफ केले. राज्यात सर्वांच्या जीवनात चांगले जीवन आणण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार हे तुमच्या सर्वांचे आहे, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांचं आणि गोविंदाचं देखील. गोविंदाच्या या सणाला आपण सार्वजनिक सुटी दिली आहे. तसेच दुसरीकडे गोविंदांना दुर्दैवाने काही झाले तर १० लाखांचे विमाकवचही घोषीत केले आहे. तसेच प्रो कबड्डी प्रमाणे आता प्रो गोविंदा पुढच्या वर्षापासून सुरु होईल. तसेच क्रीडामध्ये ५ टक्के आरक्षणही लागू होईल, असे ते म्हणाले.