दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर सीबीआयची धाड

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. यासंदर्भात स्वत: सिसोदिया यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, सीबीआयच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी ट्विटवरुन सांगितले आहे.

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. या धाडीत अनेक राजकीय मंडळींचा समावेश दिसून येत आहे.

गत महिन्यात प. बंगालमध्ये पार्थ चॅटर्जींच्या संपत्तीवर धाड टाकल्यानंतर महाराष्ट्रातही ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

सिसोदिया यांनी ट्विट करुन सीबीआयचं स्वागत केले आहे. सीबीआय आली आहे, तीचे स्वागत करतो. आम्ही कट्टर इमानदार आहोत, लाखो मुलाचं भविष्य बनवत आहोत. आपल्या देशात जे चांगलं काम करत आहेत, त्यांना त्रास दिला जातो, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणूनच आपला देश आत्तापर्यंत १ नंबर होऊ शकला नाही, असे ट्विट मनिष सिसोदिया यांनी केले आहे. सत्य लवकर बाहेर येण्यासाठी आम्ही सीबीआयला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या. पण, त्यातून काहीही समोर आले नाही. यातूनही काही पुढे येणार नाही. देशातील चांगल्या शिक्षणासाठीचे माझे काम थांबू शकत नाही, असे ही सिसोदिया यांनी म्हटले आहे.