गडकरी आऊट, फडणवीस इन! केंद्रीय निवडणूक समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान

भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना वगळलं

नवी दिल्ली,१८ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या समितीमध्ये आता एकही मराठी माणूस नाही.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्त्यांसह राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर राजकीय पक्षांशी युती करण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणारे संसदीय मंडळ ही भाजपची सर्वोच्च संस्था मानली जाते. 

भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठी पद दिली जात नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे.

भाजपाच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, आणि बी. एल. संतोष या नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादी देखील जाहीर केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करणाऱ्या भाजपच्या १५ सदस्यांच्या नव्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. या समितीत एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. फडणवीस यांची निवड या समितीवर झाल्याने त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.