राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच अटक? मोहीत कंबोज यांच्या ट्विटने खळबळ ‘हर हर महादेव! अब तांडव होगा!’

मुंबई ,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. आधीच मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्यात आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी ट्विटची मालिका शेअर केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो. लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. याआधीही नवाब मलिक यांच्या अटकेपूर्वी कंबोज यांनी याच आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर मलिकांना अटक झाली होती. यामुळे त्यांचे हेही भाकीत खरे होते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कंबोज यांनी “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असे ट्विट केले आहे. त्यामुळे आता नक्की कोणत्या नेत्यावरती कारवाई होणार आहे की आणखी कोणत्या बड्या नेत्याचा घोटाळा ते उघड करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोहित कंबोज यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. “भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी,” या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांड्ये, संजय राऊत अशी चार नावांची यादी शेअर करत पाचवी जागा रिकामी ठेवली आहे. आणि त्याच्या खाली आमचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे, असे म्हटले आहे.