हिंदूंना टार्गेट केल्यास, जशास तसे उत्तर देणार- भाजप आमदार नितेश राणेंचा इशारा

मुंबई : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी हिंदूंना टार्गेट केल्यास, जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. अमरावतीचे उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी कर्जत मध्ये प्रयत्न केले जात होते. त्याचबरोबर कर्जतमध्येही एका हिंदू युवकावर हल्ला करण्यात आल्याचा दावा नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे पण वारंवार या प्रकरणाला पुढे करत हिंदूंवर हल्ले होत असतील तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आता काही महाविकास आघाडी सरकार राहिले नाही, आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक राहिले नाही, त्यामुळे लवकर हे हल्ले बंद करावे, हिंदूंना टार्गेट केलेत, तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही राणे म्हणाले.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली, भाजप नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अहमदनगरच्या कर्जतमध्येही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राणेंनी दिले.

आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं ऐकलंय का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावं लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असा खुला संदेश द्यायचा असल्याचे नितेश राणे म्हणाले.

“आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे राज्य आहे. त्यामुळे हिंदुंवर अत्याचाराच्या किंवा हिंसेच्या घटना घडल्या तर हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, हा संदेश ज्यांना समजून घ्यायचाय त्यांनी समजून घ्यावा.” असाही इशारा राणेंनी केला आहे.