कीर्तिकरांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर!

उरलेल्या आमदार आणि खासदारांचा राष्ट्रवादीसोबतच्या युतीला विरोध

मुंबई ,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात केली. शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणुका किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या अन्य निवडणुका भाजपसोबत युती करून लढवणार की नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही. मग आगामी निवडणुकीत शिवसेनेची युती भाजपसोबत नसेल तर कोणासोबत असेल? असा प्रश्न विचारत कीर्तीकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होणार असेल, तर उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्या आमदार आणि खासदारांचा या युतीला तीव्र विरोध आहे, अशा प्रकारचे परखड मत खासदार गजानन कीर्तिकर यांनी जाहीर सभेत व्यक्त करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे.

राष्ट्रवादीमुळे आपल्या ४० आमदारांनी पक्ष सोडला आहे. उर्वरित १५ आमदार काहीच बोलत नाहीत. ते पक्षाच्या आदेशाचे पालन करत आहेत. आमचे बारा खासदारही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. माझ्यासारखा माणूस गेला नसेल पण माझेही तेच मत आहे की, पुढील राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असता कामा नये. हे माझे मत आहे, असे ते म्हणाले.

एका बाजूला भाजप आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आम्हाला दोन्ही पक्षांशी युती करायची नसेल, तर शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवावी, असा सल्लाही खासदार कीर्तिकर यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दिला आहे.