माझे कुटुंब माझी जबाबदारी उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सणसणीत प्रतिक्रिया

गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणे गुन्हा आहे का?

नागपूर ,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेचा कडक समाचार घेतला.ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

त्यांनी सांगितले की, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही.

उद्धव ठाकरे यांना नैराश्य आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आपण गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो, कष्टातून आई-वडिलांनी आपल्याला घडवले, याचा मला अभिमान वाटतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

मुंबईत बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ठाकरे कुत्सितपणे माझ्या कुळाचा उल्लेख करतात, माझे आई-वडील शेतकरी आहेत. कष्टातून त्यांनी मला घडवलं, मला संघर्षाचा वारसा आहे. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं हा गुन्हा आहे का? असे थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले की, माझ्या कुळाचा उद्धार करून ठाकरेंचे नैराश्य दूर होणार असेल, तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

ठाकरे म्हणाले होते की, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? त्यांनी बाहेरचे उपरे एवढे घेतले की, बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.