वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस : चोवीस तासात 186 मि.मी. पावसाची नोंद

गंगथडी भागातील गावांना पावसाचा तडाखा 

वैजापूर,​६​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून दमदार पाऊस होत असून गेल्या चोवीस तासात186 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . तालुक्यात आतापर्यंत 322.4 मिलिमीटर पाऊस झाला असून समाधानकारक पावसामुळे पिकं चांगलीच बहरली आहेत.तालुक्यातील गंगथडी भागातील लाडगाव – कापूसवाडगाव परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून जोरदार पाऊस झाला.अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सलग तीन दिवसांपासून या परिसराला जोरदार पाऊसाने झोडपून काढल्यामुळे जनजीवन कोलमडले आहे.

लाडगाव येथील न्यू हायस्कूल शाळेच्या आवाराला पाण्याचा वेढा पडला होता.लहान मोठे ओढे नाले पाण्याने ओलांडून वाहात असल्यामुळे काही गावाचा संपर्क तुटला आहे.गाव शिवारात शेकडो हेक्टर मधील खरीप हंगामातील लागवड केलेली पीके पाण्यात  बुडाल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग दोन दिवसांपासून तालुक्यात पाऊसाचे  पुनरागमन झाले.लाडगाव, कापूसवाडगाव, वांजरगाव  यासह परिसरातील गावात जोरदार अतिवृष्टीमुळे शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.मात्र तहसीलकडे या परिसरात केवळ ६४ मिली मीटर पाऊस कोसळल्याची नोंद झाल्यामुळे पर्जन्यमापक यंत्रामध्ये बिघाड झाला का यांची शंका निर्माण झाली आहे.

गोयगाव – भऊरला जोडणा-या ओढा दुथडी भरुन वाहात असल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला तसेच  लाडगाव -वांजरगाव मधील फरशी पूल पाण्याखाली गेल्यामुळे सराला बेटाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. लाडगाव कडून कापूसवाडगाव, वांजरगाव कडे येण्या जाण्याचा संपर्क मार्ग बंद पडला होता. परिसरात अद्याप मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे या तीन ते चार गावातील शेकडे हेक्टर मधील खरीप हंगामातील कापूस मका पिकांची पाण्यात बुडून उध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी सोनू पोटे यांनी व्यक्त केली पाऊसाने उघडीप दिल्यानंतर तालुका प्रशासनाने या भागातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्राथमिकता द्यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती अविनाश गलांडे, जि.प.सदस्य पंकज ठोंबरे,सत्यजीत सोमवंशी यांनी केली.दरम्यान वैजापूर दौ-यावर आलेले  विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी नुकसानीचा आढावा घेऊन जिल्हाधिका-यांना पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे समजते. 

दूधाचा जल अभिषेक.. ओढ्याला महापूर आल्यामुळे सकाळी लाडगावच्या दूध डेअरी कडे निघालेल्या कापूसवाडगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून त्यांच्याकडील कँनमधील दूधाचा साठा ओढयातील पाण्यात ओतून रिकाम्या कँन घेऊन ते घराकडे परतले..