रस्त्यासाठी नालेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांचे उपोषण ; प्रशासनातर्फे तात्काळ कारवाई

वैजापूर,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-गावातील शाळेत जाण्याचा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तालुक्यातील नालेगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील 21 शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर  समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अतिक्रमण काढल्या शिवाय उपोषणस्थळ सोडणार नाही अशी ठाम भुमिका त्यांनी घेतली होती.तहसीलदार राहुल गायकवाड यांनी या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. याआदेशानुसार यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी शिऊर पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची कारवाई पुर्ण केली.

रस्ता वाटचालीसाठी पुन्हा पूर्ववत  झाल्यामुळे सकाळपासून तहसील कार्यालयासमोर  बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रात्री उपोषण मागे घेतले. दरम्यान प्रशासकीय पातळीवर हे अतिक्रमण काढण्याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय लघु जलसंधारण कार्यालयाची होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवण्यासाठी दिवसभर उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आली.या संदर्भात अधिक माहिती अशी की, डोंगराळ भागातील नालेगाव शिवारात गट क्रमांक 51, 52 व 53 ही जमीन क्षेत्र उपविभागीय लघु जलसंधारण विभागाने येथे गाव तलावासाठी संपादित करून या ठिकाणी तलावाची उभारणी केली आहे. या गाव तलाव क्षेत्रातील जमिनीत शेतकरी भानुदास चन्ने, सोपान चन्ने, प्रभाकर चन्ने, रामदास चन्ने या चौघानी अतिक्रमण करुन त्याठिकाणी तारेचे कुंपण घातले होते.त्यामुळे शेत वस्तीवरील शाळकरी मुलांचा ये – जा करण्याचा रस्ता महिन्याभरापासून बंद पडला होता. गाव तलावातील रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात यावा या मागणीसाठी गावकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांनी  अतिक्रमणधारक शेतक-याकडे विनंती केली होती.  मात्र त्यांनी धुडकावून लावली होती. सरकारी संपादित क्षेत्रात संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पोकरा योजनेतून शेततळे, पेरूची बाग लावली आहे. अडीच ते तीन हेक्टर क्षेत्रावर त्यांनी  तार कुंपण करून ताबा घेतला होता. तलावातून ये जा करण्यासाठी ते नागरिकांना विरोध करत होते. तलावातील अतिक्रमणामुळे शेतवस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करणे कठीण झाले आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांसह महिला व ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तहसिलदार राहुल गायकवाड यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. गलांडे यांनी तत्काळ जलसंधारणचे उपअभियंता ऋषिकेश देशमुख यांच्याकडे याबाबत विचारणा करत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याचे सांगितले. तलावातील अतिक्रमण काढल्याशिवाय घरी जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळे  प्रशासनाने शिऊर पोलीसांच्या मदतीने अतिक्रमण जेसीबी यंत्राने हटवले. यावेळी नायब तहसीलदार किरण नारखेडे, पोलीस नाईक संजय घुगे, सजन शिंदे, उपोषणकर्ते अनिल चोथे, रविंद्र जाधव, राजेंद्र जाधव, संजय चोथे उपस्थित होते. अतिक्रमण निघाल्याने रात्री उशिरा उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

विद्यार्थ्यांनी दिली बिस्किटे… 

सकाळी दहा वाजे पासून नालेगाव येथील 21 विद्यार्थी त्यांच्या शाळेला जाणारा रस्ता अतिक्रमण मुक्त करावा या मागणीसाठी तहसील कचेरी समोर बसले होते. दुपारच्या सुमारास याठिकाणी जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे काही कामानिमित्त तहसील मध्ये आल्यानंतर त्यांना उपोषणाच्या मांडवात शालेय गणवेशातील विद्यार्थी दिसल्याने त्यांची भेट घेतली.सकाळ पासून अन्नपाणी वर्ज्य केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी बिस्किटे मागवले.वप्रशासनातील अधिका-यांना त्यांनी उपोषण स्थळी बोलवून कुठल्याही स्थितीत अतिक्रमण काढण्याची कारवाई सांयकाळपर्यत पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला.