चिमुकल्यांना विहिरीत फेकुन मारणाऱ्या बापास जन्मठेप ; वैजापूर न्यायालयाचा निकाल

वैजापूर,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग धरुन पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकुन जीवे मारणाऱ्या वडीलास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपज्ञे दंडाची शिक्षा सुनावली. संतोष कचरु वाळुंजे (40, रा.‌गल्लेबोरगाव, ता. कन्नड) असे शिक्षा झालेल्यांचे नाव आहे. त्याने आपल्या गणेश (4) व कृष्णाव (3) या दोन चिमुकल्या मुलांना वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत ढकलुन ठार मारले होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन शेख यांनी सोमवारी (ता.1) ही शिक्षा सुनावली. 

संतोष कचरु वाळुंजे हा पत्नी व गणेश, कृष्णा या दोन मुलांसोबत गल्लेबोरगाव येथे राहत होता. तेथील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम करुन तो कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. मात्र त्याचे पत्नी सुनिता हिच्यासोबत नेहमी या ना त्य कारणावरुन भांडण होत होते. 26 डिसेंबर 2018 रोजी चहाच्या कारणावरुन भांडण झाल्याने संतोष व त्याची आई कुसुम हे दोघे गल्लेबोरगाव येथील घरातुन निघुन गेले. त्यानंतर सुनिता ही दोन्ही मुलांना घेऊन त्यांच्या पाठीमागे देवगाव फाटा येथे आली व दोन्ही मुलांना संतोष जवळ सोडुन निघुन गेली. त्यानंतर संतोष हा दोन्ही मुलांना घेऊन पायीच देवगावकडे निघाला व शिवगाव पाटी येथे चुलत मावशीकडे मुक्काम केल्यानंतर संतोष दुसऱ्या दिवशी सकाळी वैजापूर व वैजापूर येथुन सरला बेटावर गेला. तिथे जेवण व मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला जात असताना रस्त्यात कंटाळुन एका विहिरीजवळ थांबला व रागाच्या भरात त्याने दोन्ही मुलांना विहिरीत फेकुन ठार मारले. त्यानंतर संतोष शेवता येथे त्यांचे मामा रावसाहेब पवार यांच्याकडे गेला. याप्रकरणी आधी वीरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पोलिसांनी संतोष वाळुंजे यास तेथे जाऊन ताब्यात घेतले व चोकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संतोष वाळुंजे यांच्या विरोधात खुन व पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी वीरगावचे सहायक पोलिस निरीक्षक हरिष कुमार बोराडे यांनी फिर्याद दिली. तपास अधिकारी गौतम पवार यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी जिल्हा सरकारी वकिल रविंद्र सिंह देवरे यांनी एकुण 16 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन शेख यांनी संतोष वाळुंजे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन रावसाहेब रावते व बर्डे यांनी सहकार्य केले.