समृध्दी महामार्ग कामासाठी अवैध मुरूम उपसा ; एल अँड टी कंपनीला 14 कोटींचा दंड

वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांची कारवाई

वैजापूर,१५ जुलै /प्रतिनिधी :- बाळासाहेब ठाकरे नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे वैजापूर तालुक्यातील काम एल अँड टी या कंपनीने घेतलेले आहे. हे काम करत असताना कंपनीने परिसरातील मुरूम माती मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली आहे. यात कंपनीने लाखो ब्रास मुरूम विनापरवानगी उत्खनन करून वापरला आहे. तहसीलदार वैजापूर यांनी दि.4 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48  (7) व (8) अन्वये एल अँड टी कंपनीला 23498 ब्रास मुरूम अवैधपणे उत्खनन केल्याबद्दल रुपये 1200 प्रति ब्रास याप्रमाणे रुपये 2,81,97,600 इतक्या बाजार मुल्याची आणि पाच पट दंडाची रक्कम अशी एकूण 14,09,88,000 चौदा कोटी नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

एका प्रकरणात मौजे अमानतपूरवाडी येथील एका खासगी जमिनीतून कंपनीने सुमारे 81000 घन मीटर मुरूम अवैधपणे उत्खनन करून वापरला. याबाबत विपीन बबनराव साळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार वैजापूर आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी केलेल्या तपासणी आणि पंचनाम्याच्या आधारे तहसीलदार वैजापूर यांनी दि.4 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48  (7) व (8) अन्वये एल अँड टी कंपनीला 23498 ब्रास मुरूम अवैधपणे उत्खनन केल्याबद्दल रुपये 1200 प्रति ब्रास याप्रमाणे रुपये 2,81,97,600 इतक्या बाजार मुल्याची आणि पाच पट दंडाची रक्कम अशी एकूण 14,09,88,000 चौदा कोटी नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका दंड भरण्याचा आदेश दिला आहे. अशाप्रकारे एखाद्या मोठ्या कंत्राटदाराला एवढा मोठा दंड झाल्याची तालुक्यांतील ही पहिलीच घटना आहे. आता याबाबत तहसील प्रशासन दंड वसुली साठी कितपत पुढाकार घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

तहसीलदारांनी कमी उत्खनन दाखवले – विपीन साळे
समृध्दी महामार्गाच्या कंत्राटदार कंपनी एल अँड टी यांनी 81,000 घनमीटर (ब्रास)  मुरूम उत्खनन केलेले आहे. मात्र तहसीलदार वैजापूर यांनी या प्रकरणात कमी उत्खनन दाखवले आहे. या आदेशाविरोधात आपण दाद मागणार असल्याचे तक्रारदार विपीन साळे यांनी सांगितले.