अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी लाडगाव येथील तरुणास 10 वर्ष सश्रम कारावास

वैजापूर कोर्टाचा निकाल

वैजापूर,२८ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील लाड़गाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एकास दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात न्यायालयाने अन्य तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सादिक युसुफ शेख (30 वर्ष रा.लाडगाव, ता.वैजापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी बुधवारी (ता.27) ही शिक्षा सुनावली.

सोळा वर्षीय पीड़ितेस आरोपीने गोड बोलून, धमकावून व लग्नाचे आमिष दाखवून तिचे लाड़गाव येथील घरातून आरोपी अर्जुन बालाजी कुमावत रा. लाड़गाव याने मुख्य आरोपी सादिक यूसुफ शेख यास व पीडितेस 12 जुलै 2016 रोजी स्वतःचे मोटरसायकलवर बसवून नाशिक येथे आरोपी विक्रांत जालिंदर कुमावत (रा. म्हाडा सातपुर ता.जि. नाशिक) याचे घरी नेऊन सोडले व त्यानंतर अन्य आरोपी  रेखा राजू परदेशी (कुमावत) (रा. आडगाव नाका नाशिक) हिने पिडितेसह अन्य तिघांना स्वतःचे घरात ठेवून घेतले व त्यानंतर सादिक शेख याने भाड्याची खोली घेऊन तेथे पिडितेवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन चार आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी संरक्षण कायदा व ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास अधिकारी हर्ष पोद्दार यांनी दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणातील साक्षीपुरावा व जिल्हा सरकारी अभियोक्ता बाळासाहेब महेर यांचा मुद्देसूद युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी आरोपी सादिक यूसुफ शेख यास दहा वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली व इतर तीन आरोपींची सबळ पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून बर्डे यांनी सहकार्य केले.