तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवेगाव पेठ पिंपळनेर चावडी मोहल्ला येथील पूरग्रस्त भागाची पाहणी

Image

चंद्रपूर, १९ जुलै /प्रतिनिधी :-सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात त्यातही  चिमूर तालुक्यात झालेले नुकसान खूप मोठे आहे. नागरिकांच्या शेतात तसेच घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव (पेठ) येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 55 हजार हेक्‍टरवर शेतमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात तसेच नागरिकांच्या घरात घुसले. यात घरांची पडझड झाली. पुराच्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. ज्या घरांची अंशतः किंवा पूर्णतः पडझड झाली, अशा नागरिकांना प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आता पाणी ओसरत असल्याने नागरिक आपापल्या घरी परत जात आहे.

नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात येईल. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर जास्तीत जास्त मदत केली जाईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

चिमूर तालुक्यामध्ये 1 जून ते 19 जुलैपर्यंत सरासरी 701 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली.  तालुक्यातील उमा नदी, गोधनी नदी तसेच सातनाला व हत्तीघोडा नाल्याला आलेल्या पुरांमुळे एकूण 41 गावे बाधित होतात. पुरामुळे नेरी, सिरपूर, कळमगाव, पांजरेपार, बाम्हणी, सावरगाव व मालेवाडा, वाढोणा तर महालगाव काळू या गावातील एकूण 60 कुटुंबे बाधित झाली असून 208 नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Image

चिमूर तालुक्यात आलेल्या पुरामुळे खडसंगी, नेरी, चिमूर, मासळ, जांभूळघाट, भिसी व शंकरपूर या गावातील 547 घरे व 38 गोठे अंशतः बाधित झाली असून 17 घरे व 3 गोठे पूर्णतः पडली आहे. कृषी विभागाकडून केलेल्या प्राथमिक तपासणीच्या अनुषंगाने 33 हजार 645 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नवतळा, चिखलापार, गदगाव या गावातील मोठी 21 जनावरे तर लहान 2 असे एकूण 23 जनावरांचे नुकसान झाले आहे. या भागात पुरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे शोध व बचाव कार्य चंद्रपूर आपत्ती निवारण पथकाद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती  प्रशासनाकडून देण्यात आली.

Image

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, चिमूरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, गटविकास अधिकारी श्रीमती खोचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव टिके यांच्यासह प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Image

तत्परतेने मदतकार्य करणाऱ्या पोलीस – नागरिकांचा उपमुख्यमंत्र्यांकडून सत्कार

पुरात अडकलेल्या दहा व्यक्तींचे वाचविले प्राण

तत्परतेने मदतकार्य करणाऱ्या पोलीस – नागरिकांचा उपमुख्यमंत्र्यांकडून सत्कार

नागपूर पोलिसांनी चिखलापार येथील नदीच्या पुरात अडकलेल्या दहा व्यक्तींचे तात्काळ पोहचून प्राण वाचविले. त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने अडकलेल्या सर्वांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर विभागीय आढावा बैठकीत पोलीस आणि मदत करणाऱ्या नागरिकांचा प्रशस्तीपत्र देत सत्कार करण्यात आला.

हिंगणघाट येथील ऐजाज खाँ गुलाम हुसेन यांच्या कुटुंबातील दहा सदस्य दोन वाहनांनी उमरेड येथून गिरडमार्गे हिंगणघाटकडे जात होते. चिखलापार नदीच्या पुराच्या पाण्यात वाहनासह अडकले. त्यांनी 112 या मदत क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार उमरेड व भिवापूर पोलीसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तत्काळ घटनास्थळी पोहचून त्याठिकाणी पोलीस कर्मचारी पोहोचले. बेसुर येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने पहाटे साडेचारच्या सुमारास सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामध्ये पाच पुरुष, चार महिला व एका बालकाचा समावेश होता. त्यानंतर उमरेड येथील शासकीय विश्रामगृहात निवासाची व्यवस्था करुन देण्यात आली. ही सर्व कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली.

बचाव पथकामध्ये उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जोधे, पोलीस नाईक नितेश राठोड, पंकज बट्टे, सुहास बावनकर, उमेश बांते तसेच भिवापूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस हवालदार रविंद्र लेंडे, पोलीस नाईक दिपक जाधव हे पोलीस कर्मचारी आणि बेसुर येथील जितेंद्र धोटे, विशाल चौधरी, निरंजन डंभारे, अंकित कुबडे, खोंडेश्वर शिंगाडे आदिंचा समावेश होता.

आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेचे उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेचे उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

 नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना मदतकार्यात  उपयुक्त ठरू शकणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे  प्रकाशन झाले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर व अमरावती विभागातर्फे तात्काळ संदर्भासाठी ही आपत्ती व्यवस्थापन माहिती पुस्तिका  तयार करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बैठकीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला . त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे , समीर मेघे प्रतिभा धानोरकर , पंकज भोयर तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या‌ संकल्पनेतून  या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागूल यावेळी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेमध्ये विदर्भातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,  पोलीस प्रशासनातील  पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच माध्यम प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी आणि सर्पमित्रांचे संपर्क क्रमांकाचा  समावेश आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाची काळजी, विजेपासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी  नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासोबत विविध अनुषंगिक माहितीचा या दूरध्वनी पुस्तिकेमध्ये समावेश आहे.