रोटेगाव रेल्वे स्थानकावर नांदेड- हडपसर पुणे किसान एक्स्प्रेसला थांबा मिळावा – वैजापूर भाजपची मागणी

वैजापूर ,९ जुलै  /प्रतिनिधी :- नांदेड-हडपसर पुणे किसान एक्स्प्रेसला रोटेगांव रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी वैजापूर भाजपतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी व भाजपा व्यापारी आघाडीतर्फे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे.
केंद्र सरकारने शेतकरी व शेतीमालाच्या सुविधेसाठी नांदेड- हडपसर पुणे ही  किसान एक्स्प्रेस जुना गाडी नंबर 12729 व 12730 आणि नवीन गाडी नंबर 17629 व 17630 ही सुरू केली आहे. वैजापूर तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. तालुक्यातील गंगथडी भागात पाटपाण्यामुळे शेती उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.नांदेड – हडपसर पुणे किसान एक्स्प्रेसला रोटेगांव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाला तर या भागातील शेतकऱ्यांना पुणे येथील बाजारपेठ उपलब्ध होऊन निश्चितच फायदा होईल. निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, व्यापारी आघाडीचे  जिल्हा सरचिटणीस निलेश पारख, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोंदे, रामेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, धीरज बोथरा, विनय संचेती, अभिजित साखरे, सन्मित खनिजो , गिरीश चापानेरकर आदींच्या सहया आहेत.