वैजापुरात गोवंश जातीच्या 50 जनावरांची कत्तलखान्यातून सुटका ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,९ जुलै  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील शिवराई रोड परिसरात मिल्लतनगर येथून गोवंश जातीच्या 50 जनावरांची  शुक्रवारी रात्री पोलिसांकडून सुटका करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना वैजापूर शहरातील मिल्लत नगर येथे गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने  बांधून ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत, गोपनीय शाखेचे संजय घुगे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गाभुड, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल मोरे, भगवान सिंघल, ज्ञानेश्वर पाडळे यांच्या पथकाने घटनास्थळी छापा मारला असता या पथकाला तीन वेगवेगळ्या शेड मध्ये 50 गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहिल सत्तार शेख, नदीम खान व सत्तार कुरेशी (सर्व रा. मिल्लत नगर, वैजापूर) यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी 13,000 रुपये किमतीच्या 50 गोवंश जातीची जनावरे व 6,000 रुपये किमतीचे एक वासरू असा एकूण 6 लाख 43 हजार रुपये किंमतीची जनावरे ताब्यात घेतली आहे. मिळून आलेल्या जनावरांची व्यवस्था घायगाव येथील श्री.गुरु गणेश मिश्री गोपालन सेवा संघ, अहिंसा तीर्थ या गोशाळेत ठेवण्यात आलेली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहे.