सिंधुदुर्गात पावसाचा जोर; जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर

रत्नागिरी जिल्हाभर अतिमुसळधार पाऊस कायम; पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय

खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आज सुद्धा सुरूच आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वैभववाडीत कोकण रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने कोकण रेल्वे काही काळ ठप्प झाली होती. सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यात २४ तासात १५५ मिलिमीटरच्या सरासरीने एकूण १ हजार ३२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात २४०.३ मिलीमीटर एवढा नोंदला गेला. वेंगुर्ला तालुक्यात १९३.७, सावंतवाडी तालुक्यात १९०, दोडामार्ग तालुक्यात १८७, कणकवली तालुक्यात १४८.१, मालवण तालुक्यात १४५.८, कुडाळ तालुक्यात १३८.८ तर सर्वात कमी देंवगड तालुक्यात ८०.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्हा जलमय होऊन जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.

सावंतवाडी तालुक्यात तळवडे, कणकवली तालुक्यात खारेपाटण येथील बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले होते. छोट्या पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होते पाणी ओसरल्यावर पुन्हा वाहतूक पूर्ववत होते अशा घटना वारंवार घडत आहेत. काही ठिकाणी झाड, गोठे पडून नुकसान झाले आहे. पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच सुरु राहणार असल्याने जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा:पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट

जिल्हाभर अतिमुसळधार पाऊस कायम; पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट

रत्नागिरी दि. 05 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 205.00 मिमी , दापोली 145.00 मिमी, खेड 74.00 मिमी, गुहागर 77.00 मिमी, चिपळूण 169.00 मिमी, संगमेश्वर 210.00 मिमी, रत्नागिरी 69.00 मिमी, राजापूर 122.00 मिमी,लांजा 342.00 मिमी.

रेड अलर्ट जारी
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांचेकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 05 जुलै 09 जुलै 2022 रोजी या कालावधीसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पाच दिवसात दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी. ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्जुना प्रकल्प परिसरात दिनांक 04 जुलै 2022 रोजी 326 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस झाला . सदर पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहत उजव्या कालव्यामध्ये शिरले आहे. सदर पाणी काव्यातून वाहत होते. तथापि पाण्यासोबत वाहत आलेला पालापाचोळा कालव्याच्या किलोमीटर 17 च्या उर्ध्व बाजूस असलेल्या जाळी trash rack ला अडकला गेला. त्यामुळे प्रवाहाला अडथळा होऊन कालव्यामधून वाहणारे पावसाचे पाणी अडवले गेले. त्यामुळे कालव्याला लागून अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या चेंबरच्या भिंतीवरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे कालव्याचे तसेच बाजूच्या शेतीचे अंशतः नुकसान झाले आहे.अशी माहिती नियंत्रण कक्षात प्राप्त झाली आहे.

खेड तालुकयातील मौजे दाभिळ मध्ये संतोष चव्हाण यांच्या घरावर दरड कोसळली आहे. जिवीत हानी नाही. घर पूर्णत: क्षतिग्रस्त झाले आहे. गुहागर तालुक्यात मौजे अबलोली येथील 2 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
कुंभार्ली घाटात देखील दुपारी दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती.

तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 05 जुलै 2022रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

दापोली तालुक्यात दरडग्रस्त भागातील मौजे डोरसई येथील 3 कुटूंब नातेवाईकांजवळ हलविणेत आले आहेत. मौजे कुंभवे ता. दापोली येथील अजित अशोक गावखडकर वय 40 वर्षे हे वीजेच्या धक्क्याने मयत झाले आहेत.

खेड तालुक्यात मौजे खेड-शिवतर रस्त्यावर दोन झाडे पडली होती. सदरची झाडे तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मौजे रसाळगड व रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मौजे खोपी येथील 7 कुटुंबातील 24 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहे.4. खेड नगरपालिका क्षेत्रातील एकूण 37 कुटूंबातील 100 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहेत. यापैकी नगरपालीका क्षेत्रातील 8 कुटूंबांना एल पी हायस्कूल येथे हलविण्यात आलेले आहे. खेड शहरातील मच्छीमार्केट मध्ये पुराचे पाणी आल्याने 8 व्यवसायीकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

चिपळूण तालुक्यातील मौजे पेढे दुर्गवाडी व बौध्दवाडी येथील दरडप्रवण क्षेत्राजवळील 4 कुटूंबे 30 व्यक्ती

यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथील वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने (आंबडस –चिरणी) वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यात मौजे गोदवली येथे झाड पडले असल्यामुळे विजेचा खांब पडला. कोणतीही जीवितहानी नाही.
दरड प्रवण गावांची नावे -पांगरी, ओझरे बुदुक, तिवरे घेरा प्रचितगड, नायरी, कसबा संगमेश्वर (पारकवाडा शास्त्री पूल), आंबेड खुर्द, मुर्शी साखरपा, कुळये, देवळे घेरा प्रचितगड, शिवणे, काटवली, डिंगणी कुरण या गावांमधील एकूण 27 कुटूंबे 102 व्यक्ती यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील मौजे गणपतीपुळे येथील रस्त्यावरती जुने पिंपळाचे झाड पडले. कोणतीही जीवितहानी नाही.स्थानिकांच्या मदतीने सदर झाड बाजूला करण्यात आले आहे. चांदेराई बाजारपेठेतील पुलाच्या खालील पाणी ओसरले आहे.

राजापूर तालुक्यातील मौजे जवळेथर येथे दरड कोसळली असून तेथील व पूरग्रस्त भागातील 4 कुटुंबे 9 व्यक्ती व 7 जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मौजे खंडेवाडी येथील 29 कुटुंबे 120 व्यक्ती यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

मुंबई जलमय वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत

मुंबई : मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई महापालिकेने पाणी न साचण्याचा दावा केला असला तरी हा दावा फोल ठरला असून मुंबई आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोडी झाल्याचे चित्र आहे. तर लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

धारावी कलानगर रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे.

गोरेगाव ते गुंदवली या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी आहे. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. कुर्ला हायवे जंक्शन रस्ता, चेंबूर स्टेशन परिसर, चेंबूर सब वे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. काही भागात पाणी शिरल्याने रहिवाशाचे हाल झाले.

चेंबूर-सांताक्रुज जोडरस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. चेंबूरमधील शेल कॉलनी, पोस्टल कॉलनी, चेंबूर कॅम्प, भक्ती भवन, पी. एल. लोखंडे मार्ग, घाटकोपरमधील पंत नगर, गारोडिया नगर, घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम, भांडूपमधील कोकण नगर, मानखुर्दमधील रेल्वे स्थानक परिसर, चुनाभट्टी येथील रेल्वे स्थानक परिसर, स्वदेशी मिल परिसर आणि कुर्ल्यातील नेहरू नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत. मात्र कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत होता.

दरम्यान, हिंदमातामध्ये आज सकाळी पाणी न साचल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही.

घाटकोपरमध्ये घरावर दरड कोसळली, जीवितहानी नाही

घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरात पाचजण होते. दरडीच्या भागासह एक झाड घरावर कोसळले. या घटनेनंतर घरातले संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले.

बेस्टच्या वाहतूक मार्गात बदल

पावसामुळे पाणी साचल्याने बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. बस क्रमांक ३५७, ३६०, ३५५ (मर्यादित) या बसेस चेंबूर शेल कॉलनी येथून डॉ. आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत.

बस क्र ४, ३३, २४१, ८४ यांचे मार्ग नॅशनल कॉलेज येथून लिंकिंग रोडमार्गे, बस क्र २२, २५, ३०३, ३०२, ७, ३८५ यांचे मार्ग शितल टॉकीज येथून एसएलआर उड्डाणपूलमार्गे, बस क्र ३११, ३२२, ३३०, ५१७ यांचे मार्ग एअर इंडिया कॉलनी येथून एससीएलआर उड्डाणपूलमार्गे तर, सायन रोड क्रमांक २४ येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.