बोम्मईंनी पुन्हा डिवचले; महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादात आता पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, या भूमिकेचा कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनरुच्चार केला. याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे.

कर्नाटकचेही हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मंगळवारी कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नाबाबत दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर करुन घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

सीमाप्रश्न संपलेला आहे. महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याआधीही मंजूर करण्यात आले आहेत. याच भूमिकेचा पुनरुच्चार करणारा ठराव पुन्हा मांडण्यात येईल, असे बोम्मई म्हणाले. त्यांच्या या भूमिकेला विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनीही पाठिंबा दिला आहे.