सुशांत सिंग राजपूत प्रकरण; रियाला कॉल करणारा ‘एयू’ नेमकं कोण? शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल

आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ कॉल

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने ४४ कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले आहे, असा गंभीर आरोप लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी केला. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी दिले आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

“एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा सुरू आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे”, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, “लोकसभेत ड्रग्ज या विषयावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिसांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते. परंतु, मुंबई पोलिसांनी एयू म्हणजे रियाची मैत्रिण अनन्या उधास असल्याचे म्हटले होते. मात्र, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.