पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा; एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्याच्या सूचना

मुंबई ,५ जुलै /प्रतिनिधी :-हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोकणातील विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  मुंबईतील परिस्थितीवरदेखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाला सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील २ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. व वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास भेट; मुंबई शहर-उपनगरात पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात घेतला आढावा

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, रेल्वेचे २५ स्पॉट आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी उपनगरी  रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महापालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी. तसेच त्यांना नाश्ता पाणी याची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही द्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांना पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास तत्काळ मदत करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई शहर उपनगरात नियंत्रण कक्षातून सुरू असलेली कार्यवाही या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. मुंबई शहर उपनगरात पावसामुळे झाडे अथवा फांद्या पडल्याच्या घटना, सरासरी पडलेला पाऊस, पाण्याचा निचरा संथगतीने होणारी ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, रोजचे अहवाल अद्ययावत करण्याबाबतची माहिती देण्यात आली.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी.वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे, उपायुक्त यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.