मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाळासाहेबांची खरी शिवसेना शिंदेंचीच-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ,५ जुलै /प्रतिनिधी :- विदर्भ व मराठवाडा या मागास भागाच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, प्रवीण दटके, मोहन मते, टेकचंद सावरकर, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याचा संकल्प असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या मागास भागांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच सिंचन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रासाठी असलेली वीज दर सवलत तसेच वैधानिक विकास मंडळे  पुनर्जीवित करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच शेती आणि शेतकरी यांचा अधिक शाश्वत विकास करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान, सौर कृषिपंप यासारख्या योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यापासून शेती व शेतकरी वाचविण्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासोबतच मानवी चुकांमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. आवश्यक तेथे वेगाने मदत पोहोचविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेला मदत करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्याच्या काही भागात पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचा सर्वांगीण विकास करताना बारा बलुतेदार समूहातील शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करुनच परिपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येईल. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे, याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले.

विदर्भ, मराठवाडा या मागास भागांच्या विकासाला पोषक असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग देवून निश्चित कालावधी हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच मिहान प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेयात येईल. विदर्भातील 89 सिंचन प्रकल्पांना यापूर्वी मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संजय तिवारी यांनी आभार मानले.

बाळासाहेबांची खरी शिवसेना शिंदेंचीच

स्व. बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक व राजकीय वारसा एकनाथ शिंदेंकडे असून त्यांची शिवसेना ही खरी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरातील प्रेसक्लब येथे मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार शिंदेंच्या नेतृत्त्वात वेगळे निघाल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर खरी शिवसेना ठाकरेंची की, शिंदेंची असा वाद निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे स्व. बाळासाहेबांचे सुपुत्र असून त्यांचे कौटुंबिक वारसदार आहेत. परंतु, राजकीय आणि वैचारिक वारसदार एकनाथ शिंदे हेच आहेत.

बाळासाहेबांनी आयुष्यभर जोपासलेली तत्त्वे, विचारधारा आणि ध्येय-धोरणांचे पालन शिंदेच करीत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच यात दुमत नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना संपवायला कोण निघाले आहे हे उठाव करणाऱ्या शिवसेना आमदारांनी वारंवार सांगितले आहे. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांना हे कळत नसेल तर ईश्वरच जाणो असा टोला फडणवीसांनी लगावला. सत्ता स्थापनेच्या घडामोडींवर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा होता. पक्षाने त्याला मान्यता दिली, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेना आमदारांचे बंड नसून उठाव होता. शिवसेना आमदारांची खदखद पहिल्या दोन महिन्यांत लक्षात आली होती. आम्ही त्यावर नजर ठेवून होतो असे फडणवीस यांनी सांगितले. या सरकारला बाहेरून मदत करण्याची मानसिकता तयार केली होती. पण मोदी, शहा यांनी मला सरकारमध्ये राहाण्यास सांगितले.

घटनाबाह्य सत्ताकेंद्र असणे पक्षालाही मान्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पद स्वीकारल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विकासाच्या मुद्यावर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, विदर्भ, मराठवाड्यासह मागास भागाचा विकास होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि विदर्भ तर आमच्या अजेंड्यावर आहे, असे ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन नागपुरातच होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करू असे आश्वासनही फडवीसांनी दिले. एका व्यक्तीने महाराष्ट्राचे राजकारण कलुषित केले आणि येथील सुसंस्कृतपणा खड्ड्यात घातला अशी टीका कुणाचेही नाव न घेता केली. मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत सध्या काहीही ठरले नाही.

लवकरच चर्चा करून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्याच्या काही भागात पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.