शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकला

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात; आता ७०० रुपयांत होणार चाचणी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई ,४ जुलै /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र  विधानमंडळाचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन रविवारपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी  विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार व भरतशेठ गोगावले यांनी नियम २३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करणारा हा प्रस्ताव होता. विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मतविभागणी घेण्यात आली, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाल्याने त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, असे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. या प्रस्तावाच्या बाजूने १६४ तर प्रस्तावाच्या विरोधात ९९ सदस्यांनी मतदान केले, तर ३ सदस्य तटस्थ राहिले.

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख अनुपस्थित राहिले. उशिरा आल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. तर प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर कालही अनुपस्थित होते आणि आजही अनुपस्थित राहिले. जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी आहेत.