मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता; एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई ,४ जुलै /प्रतिनिधी :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, तोच कित्ता श्री. शिंदे हे आज पुढे नेत आहेत. येत्या काळात ते एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करतील असा विश्वास व्यक्त करुन त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचे आणि अदृश्यपणे मदत केली, त्यांचेही आभार, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.यासोबतच उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना ज्यांनी ज्यांनी टोमणे मारले, त्या सर्वांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे विजय वडट्टीवार, आणि चव्हाण यांचे नाव उच्चारले… ते म्हणाले, वडेट्टीवार साहेब, चव्हाण साहेब.. आभार तर मानलेच पाहिजेत..’ एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असे उघड दिसतेच आहे. मात्र अजूनही काही अदृश्य शक्तींचा या कारस्थानात सहभाग आहे. यात काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हा टोला काँग्रेसला होता की काय, अशी चर्चा सुरु आहे.

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बोलत होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे आभार मानून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे ते एक पाईक असून कर्मावर अढळ विश्वास असलेले ते एक नेते आहेत. कुशल संघटक, जनतेचे सेवेकरी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले. कार्यकर्ता, शाखाप्रमुख, नगरसेवक, मंत्री अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करुन जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या श्री. शिंदे यांनी सीमाप्रश्नावर अतिशय आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे ४० दिवस ते बेलारीच्या तुरुंगात होते, त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा दबदबा तयार झाला, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आपण मांडलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या संकल्पनेला पूर्णत्व देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागाचे मंत्री असताना त्यांनी एक विशेष उद्देश वहन संस्था म्हणून श्री. शिंदे यांच्या विभागाने उत्तम काम केले. आता या महामार्गाचा एक टप्पा पूर्ण झाला असून या प्रकल्पात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी श्री. शिंदे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन  अडथळे दूर केले. मुंबई-पुण्यातील अंतर कमी करणारी मिसिंग लेन किंवा वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू असे अनेक प्रकल्प राबविताना विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. आरोग्य हा त्यांचा आवडता विषय असून आरोग्यमंत्री असताना त्यांनी उत्तम काम केले, आरोग्य सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या. महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकल्याचा प्रसंग असो किंवा कोल्हापुरातील पूरस्थिती असो या संकटांच्या वेळी श्री. शिंदे तातडीने मदतीला धावून गेले. कमी बोलायचे आणि अधिक काम करायचे हा स्वभाव आणि संयमामुळे त्यांची जडणघडण झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सामान्य जनता-कार्यकर्त्यांची काळजी घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. अतिशय कष्टाने श्री. शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले. स्वतःच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले, पण न थकता त्यांनी आयुष्य उभे केले. निर्धार करुन वयाच्या ५६ व्या वर्षी ७७ टक्के गुण मिळवून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मुलाला डॉक्टर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने, क्षमतेने उभा असून त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द अधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून हे सरकार कुठल्याही आकसाने, बदल्याच्या भावनेने काम करणार नाही . जे चांगले निर्णय आहेत,  ते कायम करु किंबहुना हे निर्णय पुढे नेण्याच्या दृष्टीनेही काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होता आले नाही. त्यानंतर त्यांच्या मी पुन्हा येईन.. या वाक्यावरून नेहमीच टिंगल उडवली गेली. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो… ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते.

असे आहेत मुख्यमंत्री…

 विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना शिंदे यांचा हा संघर्ष विधानसभेत ऐकवला. शिंदे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टीही त्यांनी सांगितल्या.

‘महाराष्ट्राचा एकनाथ’

धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य, शिवसेनेत असताना शिंदे यांनी केलेली आंदोलने, मास लिडर म्हणून त्यांचा झालेला उदय, लोकांमध्ये मिसळणारा नेता, शब्दाला जागणारा माणूस, दिलदार मित्र, उत्तम प्रशासक, कार्यकुशल मंत्री आणि हळवा माणूस… अशा शिंदे यांच्या विविध प्रतिमा त्यांनी उलगडून दाखवल्या.

समृद्धी महामार्ग
एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्या सरकारमध्ये कार्यभार स्वीकारला. तेव्हा काहींना वाटायचे, की हे खातं देऊन त्यांचे पंख छाटले. जेव्हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना मी मांडली. त्यांना घेऊन बसलो, त्यांना सांगितले की माझी इच्छा आहे की हा महामार्ग व्हावा. तेव्हा तिथे प्रत्यक्ष ग्राऊंडवर जाऊन शिंदे यांनी समस्या सोडवल्या. तिथले अडथळे दूर केले. ज्या व्यक्तीने यात सातत्याने काम केले, त्या व्यक्तीचे नाव एकनाथ शिंदे आहे. आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय उत्तम काम केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मोर्चाची ठाण्यात व्यवस्था
सीमाप्रश्नावर जे आंदोलन झाले, त्या आक्रमक आंदोलनात शिंदे यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा तयार केला. 1986 साली त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये सीमाप्रश्नी त्यांनी कारावास भोगला. त्यातून एक मोठं व्यक्तिमत्त्व तयार झाले. ठाण्यातही त्यांनी मोठा मोर्चा काढला, असे त्यांनी सांगितले.

महालक्ष्मी एक्स्प्रेस
महालक्ष्मी पुरात अडकली होती. तेव्हा शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचं नाव माझ्यासमोर आलं. त्या दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. मी म्हटलं मी उद्धवजींना सांगतो. सर्व कार्यक्रम सोडून जा. ते बोटीतून गेले. बोटीत साप येत होते. तरीही ते गेले आणि लोकांना पुरातून बाहेर काढलं, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर पूर
यावेळी फडणवीस यांनी कोल्हापुरातील पुराचीही एक आठवण सांगितली. कोल्हापूरच्या पुरातही त्यांनी जीवनावश्यक वस्तूही त्यांनी लोकांना पुरवल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

रोज 500 लोकांची भेट
आजही ते रोज 400 ते 500 लोकांना भेटतात. मी त्यांना सांगितलं आता वेळ पाळा. कारण ते पब्लिकमधील माणूस आहेत. लोकांमध्ये रमणारे आहेत. लोकं दिसली तर त्यांची समस्या सोडवूनच ते निघतात. पण आता ते वेळेवर यायला लागले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

कमी बोलणारा पण…
कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं हे त्यांचं काम आहे. त्यांच्यात प्रचंड पेशन्स आहेत. आनंद दिघे यांच्या तालमीत ते वाढले आहेत. त्यामुळेच त्यांच्यात संयमीपणा आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

5 मिनिटांसाठी 12 तासाचा प्रवास
कुणाच्या घरी छोटा कार्यक्रम असला तरी ते तिथे जातात. उशिरा का होईना ते जातात. रात्री अपरात्रीही जातात. एकदा एका कार्यकर्त्याने कार्यक्रम घेतला होता. त्यांना चिपळूणला जावं लागलं होतं. कार्यकर्ता म्हणाला साहेब पाच मिनिटासाठी या. माझी बेईज्जती होईल. ते सहा तास प्रवास करून चिपळूणच्या दिशेने गेले होते. त्यानंतर ते कार्यकर्त्यासाठी सहा तास प्रवास करून मागे फिरले. आणि कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून पुन्हा सहा तास प्रवास केला, अशी आठवणही त्यांनी सांगितलं.

दोन मुलांचा मृत्यू
त्यांची दोन मुलं अपघातात गेली. तेव्हा संपूर्ण कुटुंब तुटून गेलं होतं. जीवनातलं सर्व संपलं असा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला होता. तेव्हा आनंद दिघेंनी त्यांना सावरलं आणि त्यांच्यातील नेतृत्व उभं केलं. स्वत: पेक्षा समाजाचं काम केलं पाहिजे, अशी शिकवण त्यांना दिली, असंही त्यांनी सांगितलं.

शेतीची आवड असणारा नेता
त्यांना शेतीची आवड आहे. त्यामुळे त्यांना थकवा येतो तेव्हा ते गावी जातात. अलिकडे त्यांचा थकवा मिटवण्यासाठी नातू आहे. नातवासोबत ते रमतात, असेही त्यांनी सांगितले.