जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे व नगरसेवक उल्हास ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून सोयीच्या राजकारणाच्यादृष्टीने राजकीय मंडळींची खलबते सुरू झाली आहे. कांग्रेस पक्षाचे वांजरगाव गटातील जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे व त्यांचे चुलत बंधू वैजापूर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक उल्हास ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निश्चित मानला जात असून 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा होणार आहे.

श्री.ठोंबरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा, विधानपरिषद निवडणुक यामुळे युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष व वांजरगाव (ता. वैजापूर) गटातील जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्यासह कॉग्रेसचे नगरसेवक उल्हास ठोंबरे, पंचायत समिती सदस्य विनायक गाढे, भालगावचे सरपंच अमृत शिंदे व अन्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील प्रवेश सोहळा 20 जून नंतर आयोजित करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला असून आपणही या निर्णयाबाबत ठाम आहोत असे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे ठोंबरे यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील प्रवेश जवळपास निश्चित झाला असून हा प्रवेश सोहळा कधी होतो याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे. ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील प्रवेशाला एका गटाचा विरोध असल्याने ठोंबरे यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक पक्षात विरोध करणारा एखादा गट असतोच. विरोधक असतातच. पण पक्ष प्रवेशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला शब्द दिला आहे.‌

विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी वरिष्ठांच्या संपर्कात होतो. याबाबत निर्णय झाला असून या निर्णयाला आता लवकरच मुर्त स्वरुप येणार आहे असे ठोंबरे यांनी सांगितले.‌ प्रवेशाबाबत माजी आमदार व राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुक्यातील सर्वेसर्वा भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासोबत चर्चा करण्यास वरिष्ठांनी सांगितले होते. मात्र, याबाबत अद्याप चिकटगावकर यांच्यासोबत कुठलीही बैठक झाली नसल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. माझ्यासह तालुक्यातील आठ ते दहा गावातील सरपंच व अन्य पदाधिकारीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले‌.

कॉग्रेसचे नगरसेवक उल्हास ठोंबरे


विधानसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. श्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण 2024 ची विधानसभा लढवू किंवा कुणालाही तिकिट मिळाले तरी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करु. मात्र सध्या तरी आमचे लक्ष केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर आहे असे ठोंबरे म्हणाले.