संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच,भाजपा माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांचा आरोप

मुंबई,२१ मे /प्रतिनिधी:- 

महापारेषण’च्या संचालक पदावर मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप सुरूच असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया तातडीने रोखावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री . पाठक यांनी सांगितले की, महापारेषणच्या संचालकपदाच्या नियुक्तीसाठी राज्य वीज मंडळाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत संचालकपदासाठीच्या पात्रता अटी पाहिल्यावर ऊर्जा मंत्री  राऊत यांनी  या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठीच हा घाट घातला असावा असा संशय बळावतो आहे. या पदासाठीच्या नियुक्तीकरीता पूर्वी ज्या अटी व शर्ती असत त्यात बदल करण्यात आला आहे. उमेदवाराने दोन टर्म्स पेक्षा अधिक वर्षे संचालक म्हणून काम केलेले नसावे , 20 वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून काम केलेले असावे व किमान एक वर्ष कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले असावे , अशा अटी या जाहिरातीत घालण्यात आल्या आहेत. एक महिन्यापूर्वीच महाजेनको च्या संचालकपदी निवृत्त झालेल्या थोटवे यांना चौथ्यांदा नियुक्त केले गेले. मात्र महापारेषण चा संचालक नेमताना 2 टर्म्स पेक्षा अधिक काळ काम केलेले नसावे, अशी अट घातली गेली असल्याने या प्रक्रियेविषयी संशय बळावतो आहे.      

सध्याच्या स्थितीत महापारेषण मध्ये ही पात्रता असलेला एकही अधिकारी नाही, हे पाहूनच अशा अटी घातल्या गेल्या असाव्यात. ‘महापारेषण’ च्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय ताकसांडे यांच्याकडे आहे. ताकसांडे यांची या पदावरील प्रतीनियुक्ती पुढे चालू राहावी  या उद्देशानेच किंवा बाहेरील अन्य उमेदवाराबरोबरची बोलणी ‘यशस्वी ‘ झाली असल्याने भरती प्रक्रियेचा हा  फार्स सुरु आहे. ताकसांडे हे महावितरण संचालक ( ऑपरेशन्स ) म्हणून काम पहात आहेत. त्यांच्यावर कामाचा मोठा  भार  असताना ‘महापारेषण’ च्या संचालकपदाच्या  जबाबदारीचा  आणखी ‘भार’ कशासाठी  याचे उत्तर ऊर्जामंत्र्यांनी दिले पाहिजे.  महापारेषण चे संचालक (प्रकल्प) हे पदही रिक्त आहे.  मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या पदासाठी ‘योग्य’ उमेदवार मिळण्यासाठी ‘बोलणी’ यशस्वी न झाल्यानेच या पदासाठीची नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नसावी, असा आरोपही श्री. पाठक यांनी केला.  

 आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी भरती प्रक्रियेत सुरु केलेला हस्तक्षेप पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया त्वरीत थांबवावी, अशी मागणी श्री. पाठक यांनी यावेळी केली.