भंगार विक्रेत्‍याचा चाकू भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद ,२२ मे /प्रतिनिधी :- किरकोळ वादानंतर आईवरुन शिवी दिल्याच्‍या कारणावरुन भंगार विक्रेत्‍याचा चाकू भोसकून खून केल्याप्रकरणी जिन्‍सी पोलिसांनी शनिवारी दि.२१ रात्री आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या. फरहान खान निजाम खान (१९, रा. रहेमानिया कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे; आरोपीला २६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी रविवारी दि.२२ दिले.

या प्रकरणात मयत साबेर शहा कासम शहा (३७, रा. नेहरुनगर) यांचा मामे भाऊ जावेद शहा बशीर शहा (३२, रा. नेहरुनगर) याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, जावेद शहा शनिवारी रात्री झोपण्‍यापूर्वी लघुशंकेसाठी घराजवळी पाण्‍याच्‍या टाकी जवळ लघुशंकेसाठी जात होते, त्‍यावेळी पाण्याच्या टाकीजवळ भांडणाचा आवाज आला. तेथे साबेर शाह आणि फरहान खान यांचे भांडण सुरू होते. एक वर्षापूर्वी फरहानच्या आईचे निधन झाले होते आणि आईवरून शिवी दिल्याने वाद सुरू होता. भांडणे सोडविण्यासाठी जावेद जात असतानाच, फरहानने चाकू काढला आणि साबेरच्या पोटात भोसकला. त्यानंतर फरहान घटनास्थळावरून पळून गेला. जावेद शहा आणि त्यांच्या नातेवाइकांनी जखमी साबेर शहा याला रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्‍याचा मृत्‍यू झाला.या प्रकरणात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेला चाकू जप्‍त करायचा आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय तसेच गुन्‍हा करण्‍यामागे आरोपीचा नेमका हेतू काय होता याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी न्‍यायालयाकडे केली.