जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष

मुंबई,२८  एप्रिल / प्रतिनिधी :-  बॉलिवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभावी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल दहा वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (२८ एप्रिल) निकाल दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी गुरुवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकला आणि या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात जिया खानचा प्रियकर असलेला चित्रपट अभिनेता सूरज पांचोली याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.

आज अखेर या प्रकरणावर निकालाची सुनावणी झाली. जिया खान मृत्यू प्रकरणात आरोपी असलेला सूरज पांचोली त्याच्या आईसोबत कोर्टात पोहोचला होता. सूरज पांचोली याची आई अभिनेत्री झरिना वहाब या वेळी सतत आपल्या मुलाला आधार देताना दिसली.

३ जून २०१३ रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.जिया खानच्या घरातून सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियाने सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते.

जिया खानने आपल्या सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीचा उल्लेख केला होता. तिचे आणि सूरजचे एकमेकांवर कसे प्रेम होते आणि नंतर अभिनेता तिच्यासोबत कसे वागू लागला, हे तिने या नोटमध्ये लिहिले होते. सूरजने एकदा आपल्याला घरातून हाकलून दिल्याचेही सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे. सूरजचा हाच बदलता स्वभाव आपल्याला सहन होत नसल्याचे देखील जियाने म्हटले होते. यावरून सूरज पंचोलीने जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मात्र, मुंबईच्या सीबीआय विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे.