स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात ‘चित्रपट निर्मिती प्रक्रिया’ विषयावर यशस्वी कार्यशाळा

नांदेड,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि औरंगाबाद येथील एम.जी.एम विद्यापीठाचे चित्रपट कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट निर्मिती प्रक्रिया’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन ०७ ऑक्टोबर रोजी झाले. उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. वैजयंता पाटील (अधिष्ठाता, आंतर विद्याशाखा अभ्यास, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड ) ह्या होत्या. या कार्यशाळेत प्रा. शिवदर्शन कदम यांनी ‘चित्रपट निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर दोन दिवस मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात नटराज  व स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन  झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. पी. विठ्ठल म्हणाले की, देशावर आलेल्या कोरोना  संकटामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे उपक्रम घेणे शक्य झाले नव्हते. तरी देखील आमच्या संकुलाच्या वतीने ऑनलाईन नाट्य व संगीत विषयावर वेबिनारद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला.  

हे संकुल मराठवाड्यातील सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी सातत्याने धडपड करत आहे. या संकुलातील अनेक माजी विद्यार्थी नाटक, चित्रपट क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करीत आहेत. हे संकुल विद्यार्थ्यांना व्यावसायिक वर्तुळात भक्कमपणे उभे राहण्यासाठी कौशल्य निर्माण करत आहे. उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. वैजयंता पाटील म्हणाल्या ‘हे संकुल कोरोना काळात इतर संकुलाच्या तुलनेत काकणभर वर आहे. याशिवाय विद्यापीठ प्रशासनाकडून या संकुलाला विशेष लक्ष देऊन मदत केली जाईल’ असेही त्या म्हणाल्या. 

कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक प्रा. शिवदर्शन कदम, एम. जी. एम. विद्यापीठ औरंगाबाद यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘मी नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र असून माझ्या जन्म भूमीत चित्रपट निर्मिती यावर काम करावे ही महत्वकांक्षा व्यक्त करत ग्रामीण भागाशी आपली असलेली नाळ जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रा. शिवदर्शन कदम यांनी विद्यार्थ्यांना चित्रपट कसा बनवायचा त्यासाठी कथा, पटकथा, संवाद याचबरोबर चित्रीकरण कसे करायचे शूट डिव्हिजन लाईट चा वापर, लाईट चे महत्त्व, प्रसंगातील भाव, प्रसंगातील मुख्य बिंदू यावर कसा आघात करायचा ई. कौशल्य यांचा वापर कसा करायचा यांचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले. दोन दिवस उत्कृष्ट प्रतिसादात कार्यशाळा यशस्वी झाली. 

आजी माजी विद्यार्थ्यांबरोबरच शहरातील जवळपास २५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सलग दोन दिवस सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचा सकारात्मक परिणाम स्थनिक कलाकारांना मिळणार आहे. भविष्यात अश्याप्रकारच्या संगीत, नाटक व चित्रपटाशी संबंधित देशातील तज्ज्ञ रंगकर्मींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कार्यशाळेचे संयोजन आणि सुत्रसंचालन प्रा. कैलास पुपुलवाड यांनी केले व तांत्रिक समन्वय डॉ. शिवराज शिंदे व आभार डॉ. अनुराधा जोशी यांनी मानले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या सकारात्मक पाठबळामुळे हि कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. प्रा. प्रशांत बोम्पिलवार, प्रा. रमाकांत जोशी,  प्रा. किरण सावंत आणि शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानेश्वर पुयड, अजीज पठाण व प्रकाश रगडे यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.