मातासाहेब देवाजी जन्मोत्सव सोहळा भव्य-दिव्य होणार

नांदेड,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-
श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या आशीर्वादाने गुरुद्वारा मातासाहेब देवाजी गुरुद्वाराच्या पावन भूमीत ‘मातासाहेब देवाजी’ यांचा 340 वा जन्मोत्सव श्रद्धाभावाने साजरा करण्यात येणार आहे.

येत्या ता.17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय धार्मिक सोहळा पाळण्यात येईल. वरील कार्यक्रमात तखत सचखंड श्री हजूर साहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, पंजप्यारे साहिबान, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, विविध दलांचे प्रमुख जत्थेदार उपस्थित राहणार आहेत. तसेच शिरोमणी पंथ अकाली बुड्ढा दल ९६ करोडीचे प्रमुख जत्थेदार बाबा मानसिंघजी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम होईल अशी माहिती गुरुद्वारा मातासाहेबचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी मातासाहेबवाले आणि संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले यांनी शनिवार रोजी दिली.
ते पुढे म्हणाले, गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या पत्नी मातासाहेब देवांजी यांचे वर्ष १७०८ मध्ये नांदेडच्या भूमीत आगमन झाले होते. नंतर माताजी यांनी  मातासाहेब ठिकाणी लंगर तयार केला होता. त्याठिकाणी गुरुद्वारा मातासाहेब विद्यमान आहे. येथे माताजी यांच्या जन्मोत्सव श्रध्दापूर्वक साजरा करण्यासाठी निहंगसिंघांचे दल, पंथ, साधू, महात्मा, कथाकार, ज्ञानी, रागी जत्थे, कीर्तनकार दर वर्षी पोहचतात. दसरा झाल्यानंतर दोन दिवसांनी हा भव्य-दिव्य सोहळा साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षी देखील हा सोहळा प्राथनुसारच साजरा करण्यात येईल. 
यात 17 ऑक्टोबर रोजी सकाळी धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होईल. श्री अखंडपाठ साहेब आरंभ आणि कीर्तन दरबार कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी 18 रोजी कीर्तन दरबार सह घोड्यांच्या नेजाबाजीचे कार्यक्रम दुपारी होईल. 19 रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान कार्यक्रमाचा समारोप भव्य-दिव्य असा होईल. तत्पूर्वी सकाळी 8 ते 10 दरम्यान सचखंडवासी संतबाबा प्रेमसिंघजी यांच्या बरसीची प्रथा व अरदास पार पडणार आहे. वरील सोहळ्यासाठी बाहेरून पोहचणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, लंगरची सोय करण्यात येत आहे. तीन दिवस सर्वधर्मिय भाविकांसाठी लंगरप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन होईल. सोबत चहा आणि फळहाराचेही लंगर सुरु राहील. यावेळी जत्थेदार बाबा दयालसिंघ मुख्तियार-ए-आम, जत्थेदार बाबा सरवन सिंघ, बाबा ईश्वरसिंघ सहायक, बाबा हरजिंदरसिंघजी, ज्ञानी गुरपिंदरसिंघ हैड ग्रंथी बूढा दल बाबा जग्गासिंघ निहंग सिंघ, गुरमीतसिंघ बेदी (विष्णुपुरीकर), गुलाबसिंघ, भाई भारतसिंघ, हरजीतसिंघ हजूरी रागी, सरताज सिंघ तबेलेवाले यांचे मोलाचे सहभाग व सहकार्य लाभणार असल्याची माहिती त्यांनी दिली.