राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत- मुख्यमंत्री

मुंबई ,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.

कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

याठिकाणी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडपातून राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. चौपाटीवर उभारण्यात आलेल्या मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चौपाटीवर उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास देखील त्यांनी भेट दिली.

सण उत्सवांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे कार्य होते. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसांडून वाहतोय, असे सांगत आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.