बारसूमध्ये पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक

राजापूर ​,२४ एप्रिल  / प्रतिनिधी :-बारसू येथे पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक असे चित्र पाहायला मिळाले. आज दुपारी बारसूच्या माळरानावर सर्वेक्षण सुरु असताना ते थांबवण्यासाठी काही आंदोलक त्याठिकाणी दाखल झाले. हजारो आलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, भर उन्हामध्येही आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी काम बंद करण्यासाठी त्यांनी गोंधळ सुरु केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघता त्यांनी आंदोलकांना तिथून हटवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात तर यश आले. पण, भर उन्हामध्ये माळरानावर होत असलेल्या या आंदोलनामुळे अनेक आंदोलकांना त्रास होऊ लागला. अनेक गावकरी आंदोलक उष्णतेमुळे तिथेच जागेवर बसले. यावेळी अनेकांना चक्करदेखील आल्याचे समोर आले. तसेच, काही आंदोलकांनी, पोलिसांनी लाठीमार केल्याचादेखील आरोप केला. त्यामुळे हे आंदोलन आता चांगलेच चिघळले असून बारसूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांशी कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

राजापूर : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवले. आता या ग्रामस्थांची माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे, असे राज्याचे उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

रिफायनरी प्रकल्पाला नाणारऐवजी बारसू येथील जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला केंद्राला पत्र लिहून सुचवली होती. ते पत्र लिहिण्याआधी त्यांनी स्थानिकांचा विचार करायला हवा होता. त्यावेळी ग्रामस्थांना विचारून पत्र देणे गरजेचे होते. पण तेव्हा कणताही विचार केला नाही. त्या पत्रानुसारच आता सर्वेक्षण सुरू झाले तर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आपण आहोत हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रशासनाचे अधिकारी लोकांशी चर्चा करायला तयार आहेत. चर्चा सुरूही आहेत. गवताला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तो वणवा पोलिसांनी विझवला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलेला नाही. प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरू आहे. अद्याप प्रकल्प करायचा की नाही हे ठरले नाही. कुठेही पोलीस कारवाईचा बडगा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. काम करणारी माणसेच आहेत. चर्चेला वाव आहे. माती सर्वेक्षण झाल्यानंतरच प्रकल्प तिथे येणार की नाही हे कळेल, असे त्यांनी सांगितले.

तसेच माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, लोकांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यास सरकार तयार आहे. लोकांना जे आवश्यक आहे ते करायला तयार आहे. माती परिक्षण झाले म्हणजे प्रकल्प होणार असे नाही. अद्याप पुरेसा वेळ आहे लोकांची चर्चा सुरू आहे. आम्हीदेखील तिथे जाऊ शकलो असतो परंतु राजकीय वातावरणामुळे तणाव आणखी बिघडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. लोकांच्या मनातील संशय दूर झाल्याशिवाय सरकार प्रकल्प पुढे रेटून नेणार नाही, असेही आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात होती. मात्र तत्पूर्वी खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली. बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्प जेथे होणार आहे तेथील माती परीक्षणाला जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे असल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू झाली आहे.