महापालिकेच्या लेटर हेडवर विविध पदांवर नियुक्त्या: आरोपीचा नियमित जामीन फेटाळला

औरंगाबाद ,२१ मे /प्रतिनिधी :- महापालिकेच्या लेटर हेडवर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून अकरा जणांना विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय प्रभाकरराव चौबे (४३, रा. विवेकानंद नगर, हडको) याने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. देशपांडे यांनी नामंजूर केला.

या प्रकरणात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजु काशीनाथ सुरे यांनी फिर्याद दिली. महापालिकेच्या लेटरहेडवर अकरा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याबद्दलचे पत्र देण्यात आले आहे. त्यावर आयुक्त पांडेय यांची स्वाक्षरी केलेली होती. ही स्वाक्षरी बनावट असून, लेटरहेडवर टाकण्यात आलेला आवक-जावक क्रमांक देखील बोगस असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दत्तात्रय चौबे याच्‍यासह ११ जणांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपी दत्तात्रय चौबे याला ११ जानेवारीला अटक करण्‍यात आली. न्‍यायालयाने त्‍याची पोलिस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला. अर्जाच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता एन.एम. पवार यांनी आरोपीच्‍या जामिनाला विरोध केला.आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदार तसेच इतर आरोपींवर दबाव आणुन गुन्‍ह्यातील इतर पुरावे नष्‍ट करण्‍याची शक्यता नाकरता येत नाही. आरोपीला जामीन दिल्यास तो पसार होण्‍याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले.