वैजापुरात बायो सीएनजी प्रकल्प सुरू होणार

वैजापूर ,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- इंधन दरवाढ आणि  वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशात तालुकानिहाय बायो सीएनजी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएल संलग्न वैजामहिमा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प वैजापूर तालुक्यात लवकरच सुरू होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचे तसेच रोजगार निर्मिती करून आत्मनिर्भर करण्यात येणार असल्याचे कंपनीचे संचालक संतराम घेर यांनी सांगितले.

वैजापूर तालुक्यात वैजामहिमा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तब्बल दहा एकर जागेवर बायो सीएनजी स्थापन केली जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना नेपिअर वाणाचे गवत लागवडीसाठी पुरविण्यात येणार आहे. या गवतापासून बायो सीएनजी प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे पिकांच्या शाश्वत उत्पन्नाबाबत कोणतीच हमी नसतांना कंपनीमार्फत दिल्या जाणाऱ्या नेपिअर गवताच्या लागवडीतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतकरी कंपनीमुळे तालुक्यातील जवळपास 2 हजाराहून अधिक कुशल,अकुशल कामगारांना रोजगाराची संधी निर्माण होईल.वीज आणि पेट्रोलला पर्याय म्हणून हा प्रकल राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांसह इतर सामान्य जनतेलाही याचा लाभ होणार असल्याचे या कंपनीचे श्री.तांबोळी यांनी सांगितले.

नेपिअर गवतापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या हत्ती गवताला गिनीगोल नेपिअर गवत म्हणूनही ओळखले जाते. तसेच या गवताचा उपयोग चारा म्हणून करतात .मात्र, या गावतापासून आता सीएनजी,पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. हे गवात साधारणतः दोन महिन्यात 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते.तीन महिन्यात एकदा कापणी केली तरी साधारणपणे वर्षातून चारवेळा कापणी होणार आहे. एक एकरमध्ये किमान 150 ते 200 टन उत्पादन शेतकऱ्यांना यातून मिळणार आहे.या गवताला प्रतिटन भाव हा एक हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास कंपनीचे संचालक देविदास त्रिंबके यांनी व्यक्त केला.