राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई ,१२ मे /प्रतिनिधी :- राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. तरीदेखील बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची दुःखद घटना घडली, याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शोक व्यक्त केला. सर्व ऊस गळीताला नेण्याचे काम सरकार करत आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे, कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

May be an image of 3 people and text that says "" बीडमधील शेतकऱ्याची आत्महत्या अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शेतकऱ्यांना सांगूइच्छितो की, सर्वांचा ऊस गळीताला नेला जाईल. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे, कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. असे कळकळीचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी केले. NcpSpeaks"

राज्यामध्ये जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात काही प्रमाणात ऊस आहे. सातारा आणि पुण्याच्या काही भागातही ऊस असून शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचं काय होणार याची भीती वाटत आहे. महाविकास आघाडीने पहिल्यापासून ऊस वेळेत नेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ऊसाचे क्षेत्र प्रचंड वाढले आहे. तसेच गळीत हंगाम देखील लांबला आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत देखील ऊस संपलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात रिकव्हरी लॉस आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. साखर आयुक्त आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे दोघेही बारकाईने लक्ष देऊन आहेत. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.