मान्सुनचे आगमन पुढील आठवड्यात

पुणे ,१२ मे /प्रतिनिधी :-उकडलेल्या गरमीच्या त्रासाने हैराण झालेल्या भारतीयांना पुढच्या आठवड्यात येणा-या मान्सूनमुळे दिलासा मिळणार आहे. यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळ कोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, येत्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस होईल आणि नंतर त्यापुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होईल.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे, बंगालच्या उपसागरावर ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.