संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची स्थापना

राज्यसभेची निवडणूक लढणार

पुणे ,१२ मे /प्रतिनिधी :- जुलै महिन्यात होणारी राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. जुलै महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर मी दावा सांगत आहे. या जागेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापन करणार असल्याचेही जाहीर केले.

ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामे करता आली. समाजासाठी कामे करायची असतील तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी खासदारकीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केले.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होत आहे. यापूर्वीच्या संख्याबळानुसार तीन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी, एक जागा शिवसेना आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी १ जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिकामी राहणार आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी ४२ मतांच्या संख्याबळाची गरज आहे. सध्या महाविकासआघाडीकडे २७ आणि भाजपकडे २२ मतं आहेत. त्यामुळे मी या सहाव्या जागेवर माझा दावा सांगतो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Image

याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बोलून विनंती केली की, राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे. म्हणून मी ते पद स्विकारले. मी राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यावेळी मी त्यांना शाहू महाराजांचे पुस्तक दिले होते. मी छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणार आहे, असे त्या पुस्तकावर मी लिहिले होते. त्याप्रमाणे आतापर्यंत चाललो. या सहा वर्षात अनेक कामे केली. व्यापक दृष्टीकोणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोणी साजरी केली असेल तर मी सुरू केली. शिवराज्याभिषेक सोहळा अधिक व्यापक केला. संसदेत शाहू महाराज आणि छत्रपतींच्या विचारावर बोललो. माझ्यामुळे राष्ट्रपती रायगडावर आले, असे छत्रपती संभाजी महाराज म्हणाले. माझ्या कामामुळे माझ्यावर विश्वास ठेवावा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मला साथ द्यावी, असे आवाहन देखील छत्रपती संभाजी राजेंनी केले.