महापालिकेच्या लेटर हेडवर बनावट नियुक्त्या,नियमित जामीन अर्ज नामंजूर

औरंगाबाद ,९ मे /प्रतिनिधी :-महापालिकेच्या लेटर हेडवर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून अकरा जणांना विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्याप्रकरणी मुख्‍य आरोपी सोनाली ज्ञानेश्र्वर काळे/नामेकर (३४, रा. पाण रांजणगाव ता. पैठण ह.मु. श्रीकृष्‍णनगर, शेंद्रा एमआयडीसी) हिने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. देशपांडे यांनी नामंजूर केला.

या प्रकरणात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजु काशीनाथ सुरे यांनी फिर्याद दिली.महापालिकेच्या लेटरहेडवर अकरा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याबद्दलचे पत्र देण्यात आले आहे. त्यावर आयुक्त पांडेय यांची स्वाक्षरी केलेली आहे. मुळात ही स्वाक्षरी बनावट असून, लेटरहेडवर टाकण्यात आलेला आवक-जावक क्रमांक देखील बोगस आहे. या क्रमांकाची पडताळणी केली असता त्याचा संदर्भ लागत नाही. या नियुक्त्यांची माहिती गुरुवारी, ४ मार्च रोजी पांडेय यांच्या मोबाइलवर व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त झाली. पांडेय यांनी त्याची लगेच दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्‍यानूसार, प्रकरणात उमेश प्रमोदराव चव्हाण, निकिता नारायण घोडके, रोहन शिवाजी जाधव, सोपान उत्तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्वर महालकर, सचिन ज्ञानेश्वर महालकर, शुभांगी विनोद चव्हाण, प्रतिक प्रमोद चव्हाण, विभावरी दत्तात्रय चौबे, विशाल राम तायडे, आणि सोनाली ज्ञानेश्र्वर काळे यांच्‍या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपी सोनाली काळे हिला ८ जानेवारीला अटक करण्‍यात आली. न्‍यायालयाने तिची पोलीस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर आरोपी सोनालीने नियमित जामीनासाठी  अर्ज सादर केला. अर्जाच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता एम.एम. अदवंत यांनी आरोपी सोनालीने अटक होईपर्यंत किती व्‍यक्तींना किंवा विद्यार्थ्‍यांना अशा प्रकारे बनावट कागदपत्रे बनूवन नियुक्ती पत्रे दिले याचा तपास सुरु आहे. आरोपीला जामीन दिल्यास ती साक्षीदार तसेच इतर आरोपींवर दबाव आणुन गुन्‍ह्यातील इतर पुरावे नष्‍क करण्‍याची शक्यता नाकरता येत नाही. आरोपीचे बँक स्‍टेटमेन्‍ट तपासायचे आहेत, आरोपीला जामीन दिल्यास ती पसार होण्‍याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले.