कोरोनाबाधित नसताना इन्शुरन्स कंपनीला फसविले ,एका आरोपीला पोलिस कोठडी 

औरंगाबाद ,९ मे /प्रतिनिधी :- कोरोनाबाधित नसताना पॉलिसी उकळण्यासाठी मनपाच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उपचार घेतल्याचे भासवून बनावट डिस्चार्ज कार्ड बनवून तब्बल ९ जणांनी कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून तब्बल चार लाख ६२ हजार रुपये उकळल्याची घटना २८ मार्च रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपींपैकी एक अमोल हनुमंतराव रानसिंग (३६, रा. सुंदरनगर, नागेश्र्वरवाडी) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी रविवारी दि.८ मे रोजी अटक केली. त्‍याला ११ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी सोमवारी दि.९ मे रोजी दिले.

प्रकरणात कोटक जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जहीर खान अजगर खान (४१, रा. मालाड ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, जहीर खान यांच्‍याकडे जोखीम नियंत्रण व तोटा कमी करण्याची जबाबदारी आहे. दाखल पॉलिसी दाव्यांची पडताळणी करण्याचे प्रमुख काम त्यांच्याकडे आहे.

७ जून २०२१ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान ११ दावे दाखल झाले होते. त्यातील कादपत्रांची पडताळणी करण्यासाठी बुलेट हेल्थ केअर सर्व्हिसचे अधिकारी  केदारेश्वर अनिलराव सपकाळ यांची नेमणूक केली होती. त्यांनी तपासणी करण्यासाठी मनपा हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर, चिकलठाणा येथे भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी आशिष बोरगे यांनी असित जगदीश वाघ (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल), अमोल हनुमंतराव रानसिंग (रा. नागेश्वरवाडी), शिवाजी शिरीष मुळे (रा. गजानन नगर, टीव्ही सेंटर, हडको), शुभांगी भरतसिंग राजपूत (रा. नारळीबाग), किशनलाल लक्ष्मणलालजी गुर्जर (रा. रांजणगाव शे.), गणेश काकासाहेब कडू (रा. पंढरपूर), इंदल भाऊसिंग राजपूत (रा. गिरीराज हौसिंग सोसायटी, पंढरपूर), इम्रान शेख मुश्ताक (रा. खोकडपुरा) आणि प्रवीण प्रभाकर पवार (रा. सातारा परिसर) यांचे डिस्चार्ज कार्ड बनावट असल्याचे लिहून दिले. त्यांनी उपचार घेतलेले नाहीत. त्यांची यापूर्वीची नोंद नाही, असेही स्पष्ट केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अटक आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.एल. दास यांनी आरोपी अमोल रनसिंग याने मिल्‍ट्रॉन येथील खोटे डिस्चार्ज बनवून इन्‍शुरन्‍स कंपनीला ५४ हजारांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ती रक्कम हस्‍तगत करायची आहे. गुन्‍ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे. आरोपींनी गुन्‍हा करण्‍यासाठी ज्या संगणक, लॅपटॉप, प्रिंटर  आणि इतर साधन सामृग्रीचा वापर केला ते जप्‍त करायचे आहे. आरोपींनी बनवाट डिस्‍चार्ज कोठे तयार केले, त्‍यांना कोणी मदत केली याचा तपास बाकी आहे. डिस्‍चार्ज कार्ड वरील हस्‍ताक्षराचे नमुने घ्‍यायचे असल्‍याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.