अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईनच राबवा

आ.सतीश चव्हाण यांची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

औरंगाबाद ,८ मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सन 2022-23 यावर्षीची अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव देखील या कार्यालयाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी, पालकांसाठी अत्यंत किचकट व वेळखाऊ असल्याने औरंगाबाद शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीनेच राबविण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शाालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

          आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील काही ठराविक शहरांमध्ये महानगरपालिका हद्दीत सन 2017-18 पासून इयत्ता 11 वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यात औरंगाबाद शहराचा देखील समावेश होता. मात्र ही ऑनलाईन प्रवेश प्रकिया रद्द करावी यासाठी मी आपल्याकडे वारंवार पाठपुरावा केला. 4 मार्च 2021 रोजी अधिवेशनात यासंदर्भात मी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. आपण देखील माझ्या मागणीची दखल घेऊन सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला वगळले. त्यामुळे मागील वर्षी औरंगाबाद शहरात विविध महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने झाले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामुळे औरंगाबाद शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात सन 2017-18 मध्ये 50 टक्के, 2018-19 मध्ये 51 टक्के, 2019-20 मध्ये 60 टक्के तर 2020-21 मध्ये 45 टक्के विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागामध्ये महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी असून देखील त्याठिकाणी जास्तीचे प्रवेश होतात. कुठल्याही सोई सुविधा नसताना (उदा. तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल क्लास रूम) प्रवेशाच्या नावाखाली ग्रामीण भागातील काही कॉपी सेंटर असलेली महाविद्यालय वाटेल ते प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारतात. याचा परिणाम शहरातील गुणवत्ता टिकवून ठेवलेल्या नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेवर असून सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ज्ञ प्राध्यापक, डिजिटल क्लास रूम आदी सुविधा असूनही ऑनलाईन प्रवेशामुळे शहरातील विविध महाविद्यालयात प्रवेश कमी होत आहेत. तसेच या प्रकि‘येमुळे शहरातील अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी (सन 2021-22 शैक्षणिक वर्ष) औरंगाबाद शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने झाल्याने शहरातील सर्वच महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश पूर्ण क्षमतेने झाले. आता कोविडचा प्रादुर्भाव देखील हळूहळू कमी होत आहे. त्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जवळपास तीन ते चार महिने चालत असल्याने अभ्यासक्रम सुरू करण्यास उशीर होतो. विशेष म्हणजे मागील वर्षी अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतल्यावर शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी याचे स्वागतच केले. विद्यार्थी, पालकांमधून कुठलीही मागणी नसताना शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकि‘येचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे उपस्थित केला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत याही वर्षी (सन 2022-23 शैक्षणिक वर्ष) अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीनेच राबविण्यात यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.