मास्क वगळता कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध हटवले

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढू नये, यासाठी सरकारने २०२० पासून अनेक निर्बंध लादले होते. मात्र आता तब्बल दोन वर्षांनंतर कोव्हिड-१९ संदर्भात लादण्यात आलेले निर्बंध ३१ मार्चपासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने सरकारने आता निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत लागू करण्यात आलेली निर्बंध हटवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलंय.

निर्बंध हटवण्याचा निर्णय घेत असताना आरोग्य मंत्रालयाने स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. ‘जर एखाद्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली तर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते राज्य निर्णय घेऊ शकते,’ असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला.

भारतात गेल्या २४ तासांत २ हजार ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आता एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ४,२४,७३,०५७ झाली आहे. मागील २४ तासांत १ हजार ७७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधक लसीचे १८१ कोटी ८९ लाख डोस देण्यात आले आहेत. भारतात सध्याच्या स्थितीत २३ हजार ०८७ सक्रीय रुग्ण आहे. सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या ०.०५ टक्के इतके आहे.