शाश्वत विकासापासून कोणीही वंचित राहणार नाही- संचालक विजय आहेर

शाश्वत विकास ध्येयाच्या या संकल्पनेला प्रभावीरित्या राबवणे गरजेचे

औरंगाबाद,६ मे /प्रतिनिधी :- चिरकाल राहणारा विकास म्हणजे शाश्वत विकास. या शाश्वत विकास प्रक्रियेत कोणीही वंचित राहणार नाही (Leave No one Behind) ही शाश्वत विकास ध्येयांची मध्यवर्ती संकल्पना असून या शाश्वत विकास ध्येयाच्या या संकल्पनेला परस्पर समन्वयाने प्रभावीरित्या राबविणे गरजेजचे असल्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग मुंबईचे संचालक विजय आहेर यांनी आज येथे सांगितले.

हॉटेल व्हिट्स येथे शाश्वत विकास अंमलबजावणी व समन्वय केंद्र आणि अर्थ व सांखिकी संचालनालय, नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकास ध्येयासंबधी’ विभागीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी श्री.आहेर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक जि.व.चौधरी, उपायुक्त (नियोजन) औरंगाबाद रवींद्र जगताप, औरंगाबादचे विकास उपायुक्त ए.जी.नवाळे, नाशिक नियोजन विभागाचे उपायुक्त प्रदीप पोतदार, औरंगाबादचे सहसंचालक डॉ.किरण गिरगावकर, दिनेश वाघ, उपसंचालक श्री.पावसे, यांच्यासह औरंगाबाद व नाशिक विभागातील सर्व सांख्यिकीय अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध  संबंधित कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती.

श्री.आहेर म्हणाले, शाश्वत विकास हा सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आणि शांतता व न्याय या चार स्तंभावर आधारित आहे. संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या दोन वर्षामध्ये चर्चा करुन शाश्वत विकास ध्येय निश्चित केली आहेत. 25 सप्टेंबर, 2015 रोजीच्या सर्वसाधारण सभेत शाश्वत विकास 2030 चा अजेंडा स्वीकारण्यात आला असून या विकास प्रक्रियेत कोणीही वंचित राहणार नाही अशी या ध्येयाची संकल्पना असल्याचे श्री.आहेर यांनी सांगितले. शाश्वत विकास ध्येयाकरीता जिल्हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. याद्वारे जिल्हा निर्देशांक प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून यात हवामानातील बदल व त्याचे दुष्परिणाम याचा सामना करण्यासाठी तात्काळ कृती करणे तसेच भूभागावरील परिस्थितीकी संस्थांचे संरक्षण, पुर्नस्थापना आणि शाश्वत वापरास प्रोत्साहन देणे, वनाचे शाश्वत व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे व वनांची अवनती व जैवविविधतेची हानी थांबविणे, अशी इतर एकूण 119 निर्देशांक आहेत. जिल्हा निर्देशांक आराखड्यातील निर्देशकांची माहिती संबंधितांना व्हावी व त्यांच्याकडून या अनुषंगाने उपलब्ध माहितीचा अंदाज यावा या करीता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

जिल्हा निर्देशांक आराखडा प्रारुप अंतिम करण्यासाठी विभागीय स्तरावर दि.04 मे ते 06 मे पर्यंत आयोजन करण्यात आले होते. दारिद्रय निर्मूलन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विवेकी उपभोग आणि उत्पादन हवामान बदलासंबधी कृती, जमिनीवरील जीवन, उपासमारीचे समूळ उच्चाटन, चांगले आरोग्य, लिंग समानता, शुद्ध पाणी आणि स्वच्छता, पाण्याखालील जीवन यावर सांगोपांग चर्चा झाली तर समारोपीय सत्रात दि.06 मे रोजी परवडण्याजोगी आणि स्वच्छ ऊर्जा, चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ, उद्योग नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा, शाश्वत शहरे आणि समुदाय शांतता, न्याय आणि सशक्त संस्था या विषयावर पीपीटीद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.