माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही – भाऊसाहेब पाटील ठोंबरे

.…तर वैजापूर विधानसभेच्या आखाड्यात पुतण्याला उतरवू 

वैजापूर, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- माझ्यासह माझ्या दोन पुतण्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तो कुणाला शह देण्यासाठी अथवा पक्षातून काढण्यासाठी केलेला नाही. या प्रवेशामागे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांना स्वारस्य नव्हते. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांसोबत माझा कोणताही वाद अथवा मतभेद नाहीत. असे सांगून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षाने आदेश दिल्यास पुतण्यास निवडणूक आखाड्यात उतरविण्यास माझी कोणतीही हरकत राहणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  शहरातील ठक्कर बाजार परिसरातील संपर्क कार्यालयात भाऊसाहेब ठोंबरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. माजी जिल्हा परिषद पंकज ठोंबर, सूरज पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, रामचंद्र शेळके, माजी पंचायत समिती सदस्य विनायक गाडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ठोंबरे म्हणाले की, माझ्यासह पुतणे विजय ठोंबरे व पंकज ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जे आरोप केले आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. त्यांनी हे आरोप का आणि कशासाठी केले? याचा उलगडा मला व्हायला तयार नाही. त्यांचे आणि माझे कोणतेही भांडण, वाद अथवा मतभेद नाहीत. उलट राजकीय जीवनात त्यांचे थोरले बंधू माजी आमदार स्व.  कैलास पाटील चिकटगावकर यांच्याशी माझी चांगली मैत्री तर होतीच. परंतु आम्ही दोघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षात राहून एकमेकांना मदतच केली आहे. एवढेच नव्हे ते जेव्हा विधानसभा निवडणुकीत उमेदवार होते तेव्हा मी त्यांना व मी जेव्हा विधानसभा निवडणुकीत उमेदवार होतो. तेव्हा त्यांनी मला मदत केली आहे. मी 1972 पासून राजकारणात असून सर्वच राजकीय मंडळींशी माझे सलोख्याचे संबंध राहीलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध असून 1980 पासून मला त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे. आज मी जरी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी यापूर्वीही त्यांच्यासोबत होतोच. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.   आम्ही या पक्षात नव्याने दाखल झालो असलो तरी स्थानिक पातळीवर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हेच नेते असणार असून त्यांच्या नेतृत्वाखालीच पुतणे पंकज ठोंबरे काम करतील. यात दुमत असण्याचे कारण नाही. थोरले चिकटगावकर व मी समकालीन राजकारणी होतो.  उलट धाकट्या चिकटगावकरांचा राजकारणात सन 2000 नंतरचा आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझे राजकीय अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे मतभेद असण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही त्यांना विचारणाही केली होती. एवढेच नव्हे तर पुतणे पंकज ठोंबरे यांनाही त्यांच्या औरंगाबाद येथील घरी बोलणी करण्यासाठी पाठविले होते. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आगामी काळात चिकटगावकर सोबत राहीले तर स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी मिळून एकत्रितपणे काम करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची गरज नाही. तसेच आमदार सतीश चव्हाण यांच्याबाबत जे आरोप चिकटगावकरांनी केले. ते बिनबुडाचे असल्याचे  ठोंबरे यांनी स्पष्ट केले. यावेळी अमृत शिंदे,  गणेश चव्हाण, दत्तू त्रिभुवन, गणेश पवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

महत्वाकांक्षा असण्यात गैर नाही

दरम्यान सन 2004 विधानसभा निवडणुकीत माझी कोणतीही तयारी नसताना काँग्रेस पक्षाने मला अचानक उमेदवारी देऊन आखाड्यात उतरविले होते. शेवटी पक्ष जो आदेश देईल. तो पाळावाच लागतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंकज ठोंबरेंना उमेदवारी दिली तर त्यांना तो आदेश पाळावाच लागेल. शेवटी पक्षादेश महत्त्वाचा असतो. राजकीय आयुष्यात सर्वांनाच महत्त्वाकांक्षा ही असतेच. त्यात काहीही गैर नसते.